"तिचं कौतुक करण्याऐवजी निलंबित करणं चुकीचं", 'त्या' कंडक्टर ताईसाठी रोहित पवार सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 17:47 IST2022-10-04T17:45:41+5:302022-10-04T17:47:12+5:30
कळंब आगारातील कंडक्टर महिलेला निलंबित केल्यावरून आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

"तिचं कौतुक करण्याऐवजी निलंबित करणं चुकीचं", 'त्या' कंडक्टर ताईसाठी रोहित पवार सरसावले
उस्मानाबाद : "तुमच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन तुम्हास कर्तव्यावर ठेवणे महामंडळास हानिकारक वाटत आहे," असे नमूद करत कळंब आगारातील दोन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यात एका महिला वाहकाचा तर एका वाहतूक नियंत्रकाचा समावेश आहे. मात्र, या महिला वाहकाच्या निलंबनाची बातमी समाज माध्यमांवर व्हायरल होताच, राजकीय मंडळी या प्रकाराची दखल घेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकारावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तिचं कौतुक करण्याऐवजी निलंबित करणं चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावरील वैयक्तिक वॉलवर विविध रिल्स अपलोड केलेले असतात. दरम्यान, त्यांच्या यातील काही पोस्टचा विचार करून, आगारप्रमुखांनी आगारातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले. यासंबंधी आगाराच्या नोटीस बोडांवर निलंबनादेश अडकविण्यात आले आहेत. कंडक्टर मंगल सागर गिरी आणि वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार अशी निलंबित कर्मचाऱ्यांचे नाव आहे. यात 'तुमच्यावर ठेवलेल्या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेता, तुम्हास कर्तव्यावर ठेवणे महामंडळास हानिकारक ठरत आहे,' असा ठपका ठेवत, शनिवारपासून निलंबित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर संबंधित महिलेच्या निलंबनाची बातमी व्हायरल झाली.
रोहित पवारांनी व्यक्त केली नाराजी
"अनेक ताणतणाव असूनही दररोज लाखो प्रवाशांना विनाअपघात सेवा देणारे #STचे कर्मचारी हे खरे हिरो आहेत. त्यातील एखादी मंगल पुरी ही भगिनी #InstaStar होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. पण त्याऐवजी तिला तडकाफडकी निलंबित करणं चुकीचं वाटतं", अशा शब्दांत रोहित पवारांनी या प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली आहे.
अनेक ताणतणाव असूनही दररोज लाखो प्रवाशांना विनाअपघात सेवा देणारे #ST चे कर्मचारी हे खरे हिरो आहेत. त्यातील एखादी मंगल पुरी ही भगिनी #InstaStar होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. पण त्याऐवजी तिला तडकाफडकी निलंबित करणं चुकीचं वाटतं. pic.twitter.com/9HPPfttksC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 4, 2022
दरम्यान, कंडक्टर ताईवर होत असलेली कारवाई पाहून सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली असतानाचा राजकीय मंडळी देखील यावरून प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्या कंडक्टर महिलेला पुन्हा कामावर रुजू करुन घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.
जितेंद्र आव्हाडही मदतीला सरसावले
"राज्य परिवहनमध्ये काम करणाऱ्या एका महिला कंडक्टरने समाजमाध्यमांचा आधार घेत स्वतःचा एक व्हिडीओ अपलोड केला. पण अत्यंत तातडीने राज्य परिवहनच्या अधिकाऱ्यांनी तिला कामावरून निलंबित केले. तिचा गुन्हा काय होता, हे मात्र कळायला मार्ग नाही. अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी (महिला व पुरुष) संपूर्ण देशातून फेसबुक, ट्विटर व इतर समाजमाध्यमांचा उपयोग करून स्वतः प्रसिद्धीच्या झोतात राहत असतात. मग या बस कंडक्टरने काय गुन्हा केला. दुसरे काही नाही हा वर्ग संघर्षाचा लढा आहे. तिला कामा वर परत घ्या", अशी पोस्ट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.