महामार्गाच्या कामावरून आमदारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:33 AM2021-04-04T04:33:40+5:302021-04-04T04:33:40+5:30
तुळजापूर : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूरनजीक झालेल्या लातूर रोड बायपास चौकात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने व शुक्रवारी झालेल्या अपघाताची ...
तुळजापूर : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूरनजीक झालेल्या लातूर रोड बायपास चौकात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने व शुक्रवारी झालेल्या अपघाताची दखल घेत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बायपास चौकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धारेवर धरून तुमची जबाबदारी पार पाडा, तुम्हाला पगार कशासाठी आहे, अशा शब्दांत कानउघाडणी करीत कामामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय नको, असे स्पष्ट केले.
यावेळी आ. पाटील यांनी उपस्थित नागरिकांकडून या बायपास चौकात आतापर्यंत अपघाताच्या किती घटना घडल्या आहेत, तसेच अर्धवट रस्ता कामाची माहिती घेतली. उपस्थित नागरिकांनी दिलीप बिल्डकॉनवाल्यांनी अर्धवट रस्ता सोडल्याचे सांगितल्यानंतर संबंधित कंपनीवर कार्यवाही करण्याची जबाबदारीही या अधिकाऱ्यांचीच आहे. रस्ता पूर्ण नाही झाला तरी रमलर टाकण्यासाठी काय अडचण आहे, अशी विचारणा आ. पाटील यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीला लेखी पत्र दिल्याचा खुलासा केला. यावर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २७ मार्च रोजी महामार्ग प्रशासनाकडून पत्र आले असल्याचे सांगितले. यावर आ. पाटील चांगलेच संतापले. सोमवारी प्रोजेक्ट डायरेक्टर यांना बोलावून घ्या, अशा त्यांनी सूचना कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या. दरम्यान, दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी या बायपास चौकात तुळजापूर-लातूर रोडवर उड्डाणपुलाचे प्रोपोजल करण्यात येत आहे, सध्या तातडीने सोलापूर-उस्मानाबाद रोडवर स्पीड ब्रेकरचे, तर तुळजापूर-लातूर रोडवर रमलिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पात्रे, पोहेकॉ अण्णासाहेब कदम, देवबोने, राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता अनंत पुयड, लॉइन कन्सल्टंट इंजिनिअर व्ही. व्ही. कुलकर्णी, भाजपचे आनंद कंदले, आकाश मस्के, मनोज मस्के, आकाश चंदनशिवे, दिलीप बिल्ड कॉनच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
...तर कंपनीवर गुन्हा दाखल करा
यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अपघातासारख्या घटना घडू नयेत यासाठी रस्त्याची जबाबदारी ही कोणाची आहे, अशी विचारणा केली. यावर पोलीस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची असल्याची सांगून आपण त्यांना उपयोजना राबवावे, असा पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. यानंतर आ. पाटील यांनी अपघात घडू नये म्हणून रस्त्याची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्गवाल्यांची असेल आणि पोलिसांनी पत्रव्यवहार करूनसुद्धा यांना समजत नसेल तर तुम्ही शासनामार्फत महामार्गवाल्यांचा निष्काळजीपणा असा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश दिले.