समस्या सोडविण्यासाठी आमदारांची ‘स्पॉट व्हिजिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:28 AM2021-03-14T04:28:42+5:302021-03-14T04:28:42+5:30
तुळजापूर : आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी तुळजापुरातील विविध भागांना भेटी देत त्या भागातील समस्या जाणून घेतल्या. तसेच ...
तुळजापूर : आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी तुळजापुरातील विविध भागांना भेटी देत त्या भागातील समस्या जाणून घेतल्या. तसेच या समस्या तत्काळ सोडविण्याबाबत संबंधितांना सूचनाही केल्या.
तुळजापूर-मोर्डा मार्गावरील बोरी नदीच्या पुलाची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, पुलावरील रस्ता खचला आहे. भाजयुमो शहराध्यक्ष प्रसाद पानपुडे यांच्या विनंतीवरून आमदार पाटील यांनी या रस्त्याची पाहणी करून उपअभियंता यांना बोलावून त्या संदर्भात तत्काळ काम करण्याच्या सूचना केल्या. नगर परिषद शाळा क्र.३ ते शिवरत्न नगर या दरम्यान रस्त्यावर पथदिवे नसल्याचे आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना तत्काळ सौर दिवे बसवून घेण्यासंदर्भात सूचना केली. गेल्या २५ वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या शिवरत्न नगरच्या रहिवाशांसाठी लवकरच नगर परिषदेच्या माध्यमातून नळ कनेक्शन, पाईपलाईनचे काम करण्यासंदर्भात पाहणी आमदार पाटील यांनी केली. यावेळी लवकरच हे काम सुरू करण्याची ग्वाही नगराध्यक्ष रोचकरी यांनी दिली. यावेळी विनोद गंगणे, नगरसेवक पंडितराव जगदाळे, बापूसाहेब कणे, नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे, इंद्रजीत साळुंखे, राजाभाऊ देशमाने, कुलदीप मगर व शिवरत्न नगर भागातील रहिवासी उपस्थित होते.