आमदारांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:56+5:302021-04-28T04:34:56+5:30
वाशी : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. असे असताना कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामात प्रशासकीय यंत्रणेत ...
वाशी : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. असे असताना कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामात प्रशासकीय यंत्रणेत मात्र समन्वयाचा अभाव दिसून येत असून, यात कामचुकारपणा दिसून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा आ.तानाजी सावंत यांनी दिला. याच वेळी येथील ग्रामीण रुग्णालयास कोरोनाच्या चाचण्या तत्काळ करण्यासाठी पाच लक्ष रुपयांची यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी वैद्यकीय विभागाकडे वैयक्तिक निधी सुपुर्द करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
आ.तानाजी सावंत यांनी बऱ्याच कालखंडानंतर मंगळवारी कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी येथील कोरोना केअर युनिट व ग्रामीण रुग्णालयास भेट देत, तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष गौतम लटके, जि.प. गटनेते दत्ता साळुंके, शिवसेना नेते प्रशांत चेडे, तहसीलदार नरसिंग जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.सावंत यांनी कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील कोरोना केअर सेंटरला भेट देत, तेथील समस्या जाणून घेत, कोरोनाबाधितांना उच्च दर्जाचे जेवण व नाश्ता देण्यात यावा व त्याची पाहणी संबधित यंत्रणेने करावी, असे आदेश दिले. यानंतर, येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कपिलदेव पाटील यांनी या रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी वीस बेड सज्ज केले असल्याचे सांगितले, तसेच कोरोनासंदर्भात काही चाचण्या करण्यासाठी मशिनरीची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्यांनी लागलीच डी़ डायमर, सेल काउंटर, अॅनालायझर आदी मशिनरी घेण्यासाठी पाच लाख रुपये देत असल्याचे जाहीर केले, याशिवाय शासनाकडून कोरोनाच्या कालावधीत जे मिळते ते घ्या, जे मिळत नाही, त्यासाठी भैरवनाथच्या माध्यमातून आपणास मदत करू, अशी ग्वाही दिली.
या भेटीनंतर आमदारांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेत विशेषत: ग्रामसेवक, तलाठी यांच्यासोबत अधिकाऱ्यांचा समन्वय दिसून येत नसल्याची खंत बोलून दाखविली. एकमेकांशी समन्वय ठेवून काम करा. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी आशा कार्यकर्तींना सोबत घेऊन प्रत्येक गावात समन्वय समितीशी संपर्क साधून जनजागृती करावी़, यासाठी लागेल ती मदत देण्यास आपण तयार आहोत, असे ते म्हणाले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महिन्द्रकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कपिलदेव पाटील, गटविकास अधिकारी विलास खिल्लारे, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, वीज कंपनीचे अभियंता रमेश शेंद्रे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष ॲड.सत्यवान गपाट, जि.प. सदस्य उद्धव साळवी, तालुका उपाध्यक्ष विजयकुमार तळेकर, शिवहार स्वामी, नागनाथ नाईकवाडी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.