लुटारूंचा धुमाकूळ, ट्रक पंक्चर करून डिझेल चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:10 AM2021-09-02T05:10:51+5:302021-09-02T05:10:51+5:30
वाशी तालुक्यातून धुळे-सोलापूर महामार्ग जातो. या मार्गावर नेहमीच छोटीमोठी वाहने अडवून मारहाण करीत लुटण्याच्या घटना घडत आहेत. वाशी पोलीस ...
वाशी तालुक्यातून धुळे-सोलापूर महामार्ग जातो. या मार्गावर नेहमीच छोटीमोठी वाहने अडवून मारहाण करीत लुटण्याच्या घटना घडत आहेत. वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक चौरे यांची बदली झाली असून, त्यांच्याकडील पदभार ३१ ऑगस्ट रोजी नवीन ठाणेदारांनी घेताच १ सप्टेंबरच्या पहाटे लुटारुंनी त्यांना सलामी दिली. दीड वाजेच्या सुमारास कन्हेरी फाट्यानजीक आठ ते दहा लुटारूंनी बीडकडून उस्मानाबादच्या दिशेने जात असलेल्या ट्रकसमोर (क्र. आरजे ५२ जीए ७४०२) तीक्ष्ण लोखंडी वस्तू टाकली़ ट्रक त्यावरुन गेल्याने तो पंक्चर झाला. त्यामुळे चालकाने वाहन बाजूला घेऊन थांबविले. याचवेळी तेथे दबा धरून बसलेले लुटारू बाहेर आले. त्यांनी चालक व क्लिनरला मारहाण करून दोरीने बांधले. त्यांच्याजवळील सहा ते सात हजार रुपये रोख व मोबाइल घेतला. तसेच ट्रकच्या टाकीतील ७० ते ८० लिटरची डिझेलची चोरी केली. घटना घडल्यानंतर ट्रक चालक हा पारडी फाट्यावर जाऊन थांबला. यावेळी वाशी ठाण्याचे गस्ती पथक तेथे आले. त्यांना ही घटना समजली. मात्र, पोलिसांची झंझट नको म्हणून, ट्रक चालकानेच तक्रार दिली नाही़ गेल्या चार दिवसांपूर्वीही याच ठिकाणी याच पद्धतीने एका ट्रकसमोर लोखंडी रॉड टाकून लुटण्याचा प्रयत्न लुटारुंनी केला होता. मात्र, चालकाने महामार्गावरच वाहन आडवे लावल्याने लुटारू पळून गेले. मात्र, या घटनेत ट्रकचे पाच टायर निकामी झाले. त्यात जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले़ नवीन ठाणेदारांपुढे आता या लुटारुंनी आव्हान निर्माण केले आहे.
तीक्ष्ण हत्याराचा लुटारुंचा फंडा...
सोलापूर-धुळे महामार्गावरून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. अशा वाहनांना अडवून लुटमार करणे, चालत्या वाहनावर वेग कमी होताच चढून आतील साहित्याची चोरी करणे असे प्रकार सर्रास घडतात. आता लुटारुंनी नवाच फंडा अंमलात आणला आहे. वाहनासमोर तीक्ष्ण हत्यारे टाकून ते पंक्चर करायचे. नंतर वाहन थांबताच चालकांना मारहाण करून रोकड, साहित्याची चोरी करायची, असा प्रकार आता वाढीस लागला आहे. त्यामुळे गस्त आणखी गतिमान करण्याची गरज वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.