फिरत्या वैद्यकीय पथकामुळे ग्रामीण आरोग्याला बळकटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:35 AM2021-05-20T04:35:13+5:302021-05-20T04:35:13+5:30
लोहारा : स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या फिरत्या आरोग्य पथकामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटी प्राप्त झाली असल्याचे मत जिल्हा परिषदेचे ...
लोहारा : स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या फिरत्या आरोग्य पथकामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटी प्राप्त झाली असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले.
लोहारा तालुक्यातील फणेपूर येथे या फिरत्या वैद्यकीय पथकाला सीईओ डॉ. फड यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यातील दुर्गम अशा ५४ गावांमध्ये फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे आरोग्य सेवा पुरविली जाते. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, वृद्ध आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेचा वेळ, पैसा वाचवा, गरोदर मातांची प्रसूतीपूर्व सेवा, प्रसूतीपश्चात तपासणी त्यांच्या गावात व्हावी, बालके व किशोरवयीन मुलांची तपासणी व उपचार, रक्तदान, मधुमेह, कुष्ठरोग आदी तपासण्या, तज्ज्ञांच्या सहकार्याने महिलांची गर्भाशय कॅन्सरविषयक तपासणी मोफत करण्यात येते, अशी माहिती प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, डॉ. किरण गरड, गटविकास अधिकारी ए. एस. अकेले, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, सतीश गिरी, डॉ. सुनीता चक्करवार, फणेपूरच्या सरपंच तहेराबी मुल्ला, ग्रामसेवक ए. बी. गोरे आदी उपस्थित होते.