पुन्हा अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसाेहळे लाॅकडाऊन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:32 AM2021-05-14T04:32:13+5:302021-05-14T04:32:13+5:30
घाटावरील भागात मुहूर्तावर अन् डामडौलात विवाह सोहळा साजरा करण्याची मोठी हौस असते. दिवाळीनंतरच्या तुळशी विवाहानंतर विवाह करण्यास मुभा असते. ...
घाटावरील भागात मुहूर्तावर अन् डामडौलात विवाह सोहळा साजरा करण्याची मोठी हौस असते. दिवाळीनंतरच्या तुळशी विवाहानंतर विवाह करण्यास मुभा असते. परंतु, ही लग्नसराई खऱ्याअर्थाने बहरात येते ती चैत्र, वैशाखात. यातही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तानंतर मोठ्या संख्येने ‘कुर्यात सदा मंगलम’ हे सूर कानी पडतात.
मात्र, गतवर्षी याच दिवसात कोविड विषाणूची ‘एन्ट्री’ झाली अन् सारे काही लॉकडाऊन झाले. यातून ‘वेडिंग इंडस्ट्री’ अद्याप सावरली नव्हती, तोच ‘सेकंड वेव्ह’च्या प्रवाहात सलग दुसऱ्या वर्षी वहिवाटली आहे. याशिवाय विवाह कार्यासाठी केलेले अनेकांचे ‘तिथीनिश्चय’ एकतर पुढे ढकलावे लागले आहेत किंवा त्यांना आटोपते घेत छाेटेखानी विवाह करावे लागत आहेत.
चौकट
मे महिन्यातील मुहूर्त....
यंदाच्या एप्रिल महिन्यात सात तिथी व १६ मुहूर्त होते. यानंतर मे अर्थात वैशाखात एक ते ३१ मे दरम्यान १७ विवाह तिथी व त्यामध्ये ४० विवाह मुहूर्त होते. यात ही १४ तारखेच्या अक्षय तृतीयेच्या मोठ्या मुहूर्तानंतर १० तिथी व २८ विवाह मुहूर्त आहेत. पंचागानुसार असलेले यंदाचे हे विवाह मुहूर्त लॉकडाऊनमुळे मात्र हुकले आहेत.
नियमांचा अडसर...
कार्याला मुभा, कार्यालय मात्र बंद
जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी कोविडच्या धर्तीवर लॉकडाऊन संदर्भात आदेश निर्गमित केले. यात ‘मंगलकार्य’ होतील परंतु, ‘मंगल कार्यालय’ बंद राहतील असे आदेशित केले. यात २५ व्यक्तींच्या उपस्थितीत कार्य उरकण्याची मुभा दिली असली तरी कार्यालये बंद असणार आहेत. यामुळे काही कार्ये होत असली तरी नियमांचा अडसर मंगल कार्यालयांना व विवाह कार्य असलेल्या कुटुंबांना येत आहे.
मंगल कार्यालयाचे गणित
उत्पन्न शून्य, खर्च मात्र कायम
कळंब शहरात नऊ तर ग्रामीण भागात दहा अशी मंगल कार्यालये आहेत. याठिकाणी लग्नकार्य पार पाडण्याचा अलीकडे प्रघात वाढत चालला आहे. असे असले तरी गत मार्चपासून या मंगल कार्यालयांचे सलग दोन सिझन अचानक लागलेल्या लॉकडाऊनच्या संकटामुळे वाया गेले आहेत. यामुळे उत्पन्न शून्य अन् खर्च कायम अशी कोंडी व्यवस्थापनाची झाली आहे. स्वच्छता, कर्मचारी, पाणी, वीज, नगरपालिका कर, गार्डनिंग आदींचा खर्च तर सुरूच आहे. याशिवाय या लग्नसराईवर निर्भर असलेल्या फुल उत्पादक, आचारी, बँड पथक, फोटोग्राफी, किराणा अशा अनेकांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. अनेक वधू व वर पित्यांना आपला मुहूर्त बदलावा व ठिकाण बदलणे भाग पडले आहे. आमची बुकींग वाया गेली आहे. न भरून येणारे नुकसान झाले आहे असे राजू नागटिळक यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
माझ्या मुलीचा तिथीनिश्चय झाला होता. यानंतर लॉकडाऊन पडले. यामुळे परत मुहूर्त बदलला. यानंतर मंगल कार्यालयाऐवजी शासनाच्या निर्देशानुसार मोजक्या लोकात शेतात विवाह कार्य पार पाडावे लागले.
-एस. एन. आडसूळ, वधूपिता, इटकूर.
यंदा कसली लग्नसराई. ऐन सिझनमध्येच लॉकडाऊन आहे. यामुळे बुक झालेले ‘शेड्युल’ रद्द झाले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हातावर पोट असलेल्या अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. मग त्यात बँडवाले असोत की स्वयंपाकी.
-परमेश्वर मोरे, इव्हेंट मॅनेजमेंट.