माकडाने घेतला चौघांचा चावा; मर्कटोच्छादाने येडशीकर झाले त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 07:29 PM2018-07-13T19:29:49+5:302018-07-13T19:30:46+5:30
येडशी येथे एका माकडाने आज चार जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे़ त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन सोडून देण्यात आले़
येडशी (उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे एका माकडाने आज चार जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे़ त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन सोडून देण्यात आले़
येडशी येथे गेल्या काही वर्षांपासून एका माकडाची मोठीच दहशत निर्माण झाली आहे़ वनविभागाने जंग जंग पछाडले तरी हे माकड त्यांच्या जाळ्यात अडकेना़ येडशी गावात या माकडाने चावा घेऊन अनेकांना जखमी केले आहे़ काही दिवस शांत बसल्यानंतर शुक्रवारी या माकडाने पुन्हा उच्छाद मांडला़ त्याने दिवसभरात चौघांना चावा घेऊन जखमी केले़ येथील बसस्थानकात शोभा मडके (रा़ मोहा), जिकरा बागवान (रा़ येडशी), मोहन शिंदे (रा़ येडशी) या तिघांना तर तनुजा धाबेकर या मुलीवर उस्मानाबाद रस्त्यावर माकडाने हल्ला केला़
या सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ़ एस.पी.गिरी यांनी उपचार केले़ दरम्यान, येथील बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक अरुण कदम यांनी स्थानकात हे माकड प्रवाशांच्या वस्तू पळवीत असून, ते त्यांच्यावर हल्लाही करीत असल्याचे सांगत वनविभागाकडे माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे़
एकाचीच दहशत़
काही महिन्यांपूर्वी वन विभागाने व ग्रामपंचायतीने सिलोड्ड येथील समाधान गिरी व येडशी येथील बाबू काळे यांना माकडे पकडण्यासाठी आणले होते़ ६ हजार ३०० रुपये खर्च करुन १९ माकडे पकडण्यात आलीही़ मात्र, हल्लेखोर माकडापुढे त्यांनी हात टेकले़ ते काही यांच्या हाती लागलेच नाही़