वारकरी साहित्य परिषदेचे तहसीलसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:20+5:302021-09-04T04:39:20+5:30
लोहारा : कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकार, कलावंतांना राज्य सरकारने मानधन देण्याची घाेषणा करून वर्ष उलटले तरी अद्याप ...
लोहारा : कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकार, कलावंतांना राज्य सरकारने मानधन देण्याची घाेषणा करून वर्ष उलटले तरी अद्याप मानधन दिले नाही. घाेषणेची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी लाेहारा तालुका वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील सर्वच धार्मिक उपक्रम अखंड हरीनाम सप्ताह, पारायण सोहळे वर्षापासून कोरोना महामारीमुळे बंद होते. बहुतांश कीर्तनकार, लोककलावंतांचा उदरनिर्वाह यावरच चालतो; परंतु धार्मिक व इतर कार्यक्रम घेण्यास मनाई केल्यामुळे गायक, वादक, टाळकरी, विणेकरी यांच्यासह नाट्य कलावंतांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनच्या काळात लोक कलावंतांना दर महिन्याला मान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. जवळपास एक वर्षाचा कालखंड उलटला तरी अद्याप मानधन दिले नाही. त्यामुळे मानधन त्वरित द्यावे, या मागणीसाठी वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात महिला कलावंतांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आंदाेलनात तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कुंभार,भगवान गरड, सतीश माळी, हरी वाघे मधुकर भरारे, सदाशिव बिराजदार, शिवाजी बिराजदार, भास्कर मोरे, रवी कोळी, शिवाजी मोरे, तुकाराम काडगावे, सिंधुताई बडोरे, जयश्री कुलकर्णी, भारताबाई फुरडे, सरस्वती यादव, जिजाबाई कांबळे, अनिता फुरडे, सुनीता घोटाळे, गोकर्णा बिराजदार, सचिन दासीमे आदी सहभागी झाले हाेते.