'सर्वोच्च पदी जाऊनही फेसबुकचा कमेंट बॉक्स बंद करावा लागतोय'; ओमराजेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 11:09 AM2022-09-11T11:09:04+5:302022-09-11T11:09:19+5:30
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
उस्मानाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिवसेनेशी बंडखोरी करून महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार केले. त्यानंतर एकनाथ शिंदेंसह अनेक बंडखोर आमदार आणि खासदारांनी त्यांचा फेसबुक कमेंट बॉक्स बंद करून ठेवला होता. यावरुन आता उस्मानाबाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाश शिंदेंवर टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते वर्षा बंगल्याहून मातोश्रीकडे जायला निघाले तेव्हा आबालवृद्धांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा लोक जमले होते. मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या सर्वोच्च पदी जाऊनही फेसबुकचा कमेंट सेक्शन बंद करावा लागत असल्याची टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
विविध प्रलोभनांना बळी पडून सामान्य शिवसैनिकांनी मोठे केलेले नेते जरी पक्ष सोडून गेले, तरी या पावसात उभा असणारा हा प्रत्येक शिवसैनिक येणाऱ्या काळात गेलेल्या प्रत्येकाला ज्याची त्याची जागा दाखवेल. ज्या पद्धतीने कटकारस्थान करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली ही घटना प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये सातत्याने सलत आहे. वेळ आल्यानंतर शिवसैनिक या घटनेचे उत्तर आपल्या अमूल्य अशा मताच्या माध्यमातून गेलेल्यांना देईल, असा इशारा देखील ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी दिला.
राज्यात ५ वर्षे मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे राहिले तर, २०२४ साली ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होतील, ही भीती असल्यानेच भाजपने सरकार पाडले, असा आरोप शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे. तसेच, भाजप विरोधी प्रत्येक राज्यात जे पक्ष आहेत, ते पक्ष उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यामागे उभे राहतील हे भाजपला कळून आले होते. म्हणूनच, कुणाला खोके दिले, कोणाला धमकी दिली, अजून काही दिलं आणि आपल्याला पायउतार व्हावं लागलं, असा गंभीर आरोप वरुण सरदेसाई यांनी केली आहे. सरदेसाई सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबादेत युवासेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.