MPSC Exam : लॉकडाऊनमुळे गावी परतलेल्या विद्यार्थ्यांसमोर केंद्रावर जाण्याचा पेच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:38 PM2020-08-07T17:38:58+5:302020-08-07T17:42:14+5:30
परीक्षा केंद्र निवडलेल्या शहरांतील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता, परीक्षेसाठी जायचे कसे, असा पेच विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.
- समिर सुतके
उमरगा (जि. उस्मानाबाद) : सराकरी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई-पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेलेले शेकडो विद्यार्थी लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी परत आले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर कधी येणार? हे सांगणे कठीण आहे. असे असतानाच राज्यसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गावी परतलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे यासारख्या महानगरातील परीक्षा केंद्र निवडली आहेत. परंतु, अशा शहरांतील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता, परीक्षेसाठी जायचे कसे, असा पेच विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याचे ठिकाण परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
तालुक्यातील शेकडो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या ठिकाणी जातात. जिल्ह्यातून ही या महानगरांमध्ये हजारो विद्यार्थी गेलेले आहेत. तिथे महागडे क्लासेस लावून किरायाच्या खोल्याही घेतल्या. योग्यपद्धतीने अभ्यास सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आता तर संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरातील बहुतांशजण आता आपल्या मूळ गावी परतले आहेत. गावात येऊन त्यांनी आपला अभ्यास आॅनलाइन पद्धतीने सुरू ठेवला. अशातच राज्य लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होईल, असे जाहीर केले. पीएसआय, एसटीआय, एएसओ या परीक्षा ११ आॅक्टोबरला होणार आहेत. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. या सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी हजारोच्या संख्येने विद्यार्थी बसतात.
यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई-पुण्यात या सारख्या महानगरातील परीक्षा केंद्र निवडली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ही मंडळी आता गावात आली. अनेकांनी आपल्या भाड्याच्या खोल्याही सोडल्या आहेत. अशा स्थितीत तालुक्यासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुण्यासारख्या शहरातील केंद्रावर जाणे कठीण झाले आहे. विशेषत: ग्रामीण गरीब होतकरू विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. ही अडचण लक्षात घेता, मूळ गावी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जिल्ह्याच्या ठिकाणचे केंद्र निवडण्याची मूभा द्यावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
जिल्ह्यानुसार केंद्र द्यावे
मी दोन ते तीन वर्षापासून परीक्षेची तयारी पुण्यामध्ये करीत होतो. परंतु, कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मी गावी परतलो. लोकसेवा आयोगाची परीक्षा ही १३ सप्टेंबर रोजी सुधारित वेळापत्रकानुसार होत आहे. मात्र, माझे परीक्षा केंद्र पुण्यात आहे. सध्या हे शहर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. अशा शहरात जाऊन परीक्षा देणे कठीण आहे. त्यामुळे आमच्या जिल्ह्यानुसार केंद्र द्यावे. - हनुमंत सोलंकर,कोरेगाववाडी
पुण्यात परत जाऊन परीक्षा देणे कठीण
१३ सप्टेंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ११ आॅक्टोबर रोजी संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. मी दोन वर्षांपासून पुणे येथे परीक्षेची तयारी करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी आले आहे. आताच्या परिस्थितीत पुण्यात जाऊन परीक्षा देणे कठीण आहे. त्यामुळे आम्हाला लातूर वा उस्मानाबाद सेंटर द्यावे. - पूजा उदबळे, उमरगा
एमपीएससीशी पत्रव्यवहार करणार
अनेक विद्यार्थी महानगरात कोचिंगसाठी गेले होते. परंतु आता ते परत आले आहेत. त्यांच्यापुढे परीक्षेला जाण्याचा प्रश्न आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी आपण एमपीएससीशी पत्रव्यवहार करणार आहोत. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा.
- डॉ.राम जाधव, संचालक, दिशा अकादमी, उमरगा