बेंगळुरुच्या एमटेक तरुणाची दिल्लीवर चाल; शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पायी भारत यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 08:13 PM2021-10-07T20:13:55+5:302021-10-07T20:16:06+5:30
farmers protest : शेतीचा वारसा लाभलेल्या कुटूंबातील या तरुणाने दिल्ली बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कर्नाटकातील मलेमहादेश्वर येथून ११ फेब्रुवारी रोजी पायी यात्रा सुरु केली.
उस्मानाबाद : अन्नदाता शेतकर्यांवर त्यांच्या हक्कासाठी वर्ष-वर्ष आंदोलन चालविण्याची वेळ येते, हे पाहून व्यथित झालेल्या बेंगळुरुच्या एका उच्चशिक्षित तरुणाने शेतकरीआंदोलनाचा भारतभर जागर घालण्याचा निर्धार करीत पायी यात्रा सुरु केली आहे. मंगळवारी सायंकाळी या तरुणाने चालतच उस्मानाबाद गाठले. यावेळी त्याचा शेतकर्यांसाठी लढणार्या संघटनांनी सन्मान केला.
नागराज कलकुटगर असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे शिक्षण एमटेकपर्यंत झालेले असून, शेतीचा वारसा लाभलेल्या कुटूंबातील या तरुणाने दिल्ली बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कर्नाटकातील मलेमहादेश्वर येथून ११ फेब्रुवारी रोजी पायी यात्रा सुरु केली. दररोज २५ किलोमीटर चालून वाटेत भेटणार्या शेतकर्यांमध्ये कायद्याविरुद्ध जागृती करीत तो निघाला आहे. मध्यंतरी दुसरा लॉकडाऊन लागला तेव्हा काही काळ ही यात्रा स्थिगित केली होती. मात्र, ३ जुलैपासून नागराजने चित्रदुर्ग येथून पुन्हा या यात्रेला सुरुवात केली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी नागराजने उस्मानाबाद गाठले. तेव्हा येथील किसान सभेच्या वतीने सचिव सुदेश इंगळे यांनी त्याचा सन्मान केला. यावेळी लखीमपूर येथील घटनेचा निषेधही करण्यात आला. उस्मानाबादेत मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळी नागराजची पदयात्रा पुढे रवाना झाली. यावेळी किसान सभेच्या पदाधिकार्यांसह नागराजला शुभेच्छा दिल्या.
तो जगला तर जग जगेल
मागील वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज तयार करण्याचे काम मागील वर्षभरात झाले. तरीही शेतकरी मागे सरला नाही. सरकारी यंत्रणांची दमनशाही झुगारून हे आंदोलन सुरू ठेवले आहे. माझ्यासारख्या तरुणास हे सगळे पाहून अस्वस्थ वाटत होतं. मग मी ठरवलं की आपण देशभर यात्रा करीत लोकांमध्ये जागृती करावी. माझा उद्देश इतकाच आहे की शेतकरी हा अन्नदाता आहे, तो जगला तर जग जगेल. यासाठीच माझा एक छोटा प्रयत्न सुरु आहे.
-नागराज कलकुटगर