गतीमंद मुलीवर अत्याचार करून खोलीत डांबले; विशेष शिक्षिकेच्या संवादानंतर झाला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 07:50 PM2024-09-19T19:50:07+5:302024-09-19T19:51:17+5:30
पडक्या घराच्या कुलूपबंद खोलीतून मुलीचा ओरडण्याचा आवाज येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी केली मुलीची सुटका
वाशी (जि. धाराशिव) : मुंबई येथून एका गतिमंद मुलीस वाशी येथे आणून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. पीडितेला एका पडक्या खोलीत डांबून ठेवल्यानंतर ओरडण्याचा आवाज ऐकून पोलिसांनी तिची सुटका केली. याप्रकरणी सोमवारी रात्री एका आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास वाशी पोलिसांनी ताब्यातही घेतले.
वाशी शहरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पडक्या घराच्या कुलूपबंद खोलीतून मुलीचा ओरडण्याचा आवाज येत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली. यानंतर सहायक निरीक्षक श्रीनिवास सावंत यांच्यासह जमादार शंकर लोंढे, सचिन वारे, अशोक करवर, निर्मला ताटे यांनी तेथे पाहणी केली असता खोलीत मुलीस डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तिची सुटका केल्यानंतर ती गतिमंद असल्याचे लक्षात आले. दरम्यान, तातडीने तपास करून वाशी पोलिसांनी या मुलीला वाशीत आणणारा आरोपी दत्ता माणिक गायकवाड यास ताब्यात घेतले.
सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर त्याने पीडित मुलीस मुंबईच्या चेंबूर भागातून लग्न करून १४ सप्टेंबर रोजी वाशीत आणल्याचे सांगून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली दिली. मुलीने हा प्रकार मनाविरुद्ध झाल्याचे सांगितल्याने पोलिसांनीच पुढाकार घेत महिला कर्मचारी स्नेहलता लोमटे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास भूम उपविभागातील पिंक पथकाच्या व्ही.जे. साबळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
विशेष शिक्षिकेची घेतली संवादासाठी मदत
पीडित मुलगी ही गतिमंद असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस तिचा जबाब नोंदवून घेण्यास असमर्थ ठरत होते. त्यामुळे वाशी येथील गतिमंद शाळेतील विशेष शिक्षिकेस पाचारण करण्यात आले. या शिक्षिकेने हातवाऱ्याच्या साहाय्याने संवाद केल्यानंतर सर्व प्रकार तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने झाल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.