कर वसुलीत पालिकेची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:31 AM2021-03-19T04:31:35+5:302021-03-19T04:31:35+5:30
कळंब : मागील वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांसाठी नुकसानीचे ठरले असतानाही कळंब न.प.ची विविध करांची वसुली पन्नास टक्क्याच्या घरात गेली ...
कळंब : मागील वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांसाठी नुकसानीचे ठरले असतानाही कळंब न.प.ची विविध करांची वसुली पन्नास टक्क्याच्या घरात गेली आहे. यामध्ये सर्वात जास्त वसुली मालमत्ता कराची झाली आहे.
कळंब शहरातील नागरिकांकडून न. प. दरवर्षी विविध करांच्या माध्यमातून महसूल गोळा करते. मागील पूर्ण वर्ष कोरोनाच्या निर्बंधात गेल्याने अनेकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे यंदा वसुली कठीण जाईल, असा न. प. प्रशासनाचा अंदाज होता. नागरिकांनी विविध कर भरून न.प.ला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते. शासनाकडून कोरोनामुळे न.प.ला निधीही कमी प्रमाणात मिळत असल्याने या करातून मिळणाऱ्या उत्पन्नावर न.प.चे बरेचसे उपक्रम अवलंबून आहेत.
कळंब शहरवासीयांकडून नगर परिषदेला मालमत्ता कर ३९ लाख २९ हजार, पाणीपट्टी ७८ लाख ३८ हजार, शिक्षण कर १३ लाख ९४ हजार, रोहयो कर १४ लाख ३५ हजार, न. प. रिकामी जागा २५ लाख ४० हजार व इतर भाडे ६८ लाख ४८ हजार असे एकूण २ कोटी ३९ हजार ८४ हजार रुपये वसूल करावयाचे होते. यातून मालमत्ता कर २५ लाख ५१ हजार, पाणीपट्टी २० लाख ५० हजार, शिक्षण कर ७ लाख ५३ हजार, रोहयो कर २ लाख ३६ हजार, न. प. जागा कर ८ लाख ५८ हजार, इतर भाडे २२ लाख ३२ हजार असे एकूण १ कोटी १० लाख ६४ हजार रुपये यंदा वसूल झाले आहेत. १ कोटी २९ लाख २० हजार रुपयांची थकबाकी अजून शहरवासीयांकडून येणे आहे. यावर्षीच्या कर वसुलीत शहरवासीयांनी सर्वात जास्त म्हणजे ६५ टक्के मालमत्ता कर भरला, तर सर्वात कमी म्हणजे १७ टक्के रोहयो कर भरला. मार्च एन्डपर्यंत ८० ते ९० टक्के कर वसुली होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
चौकट -
मागील पूर्ण वर्ष कोरोना प्रादुर्भावामध्ये गेल्याने व आगामी काळातही तीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे विविध घटकांच्या उत्त्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. असे असले तरी, शहराचा कारभार चालवायचा असल्याने विविध कर हेच न.प.च्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे. तो कर भरण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला शहरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- सुवर्णा मुंडे, नगराध्यक्षा
चौकट -
मागीलवर्षी व यंदाही कोरोना साथ सुरूच असल्याने यावर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही कोणतीही करवाढ न करता शहरवासीयांना दिलासा दिला आहे. यावर्षी प्रशासनाने नागरिकांना न.प.चे विविध कर भरण्याचे आवाहन केले. त्यास कोणत्याही राजकीय पत्रकबाजीला बळी न पडता शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला. आमच्या कारभारावर शहरवासीयांनी एकप्रकारे विश्वास दर्शविला आहे. कठीण काळात शहरवासीयांची ही साथ महत्त्वाची आहे.
- संजय मुंदडा, उपनगराध्यक्ष