पालिका निवडणुकांचा निनादला शंखनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:37+5:302021-08-21T04:37:37+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील मुदत संपुष्टात येत असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका वेळेत घेण्याच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने शुक्रवारी कच्चा आराखडा तयार करण्याचे ...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील मुदत संपुष्टात येत असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका वेळेत घेण्याच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने शुक्रवारी कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे पाण्यात देव ठेवून बसलेल्या इच्छुकांची आता लगीनघाई जोरात सुरु होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांची मुदत येत्या डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. याअनुषंगाने या सर्वच ठिकाणी राजकीय लगीनघाई सुरु झालेली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पालिकांच्या निवडणुका वेळेत होतील का, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. दरम्यान, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोनाचा प्रकोप बऱ्यापैकी कमी झाला आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवनमान, बाजारपेठा सुरळीत सुरु झाल्या आहेत. परिणामी, निवडणुका वेळेत होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, मेळाव्यांचा धडाका लावला आहे. शिवाय, स्थानिक पातळीवर इच्छुकही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. यावेळी होणाऱ्या निवडणुका एक प्रभाग, एक नगरसेवक या पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेकांच्या आकांक्षेला पालवी फुटली आहे. शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये आगामी डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात मुदत संपुष्टात येणाऱ्या सर्वच नगरपालिकांचा प्रारुप आराखडा तयार करण्याबाबत सूचित केले आहे. एक प्रभाग, एक सदस्य याप्रमाणे प्रभागांची रचना करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रियेला गती येणार आहे.
ओबीसी आरक्षण, वेळ ढकलली...
निवडणूक आयोगाने आपल्या निर्देशांमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भातही भाष्य केले आहे. हा विषय आरक्षणाबाबत असल्याने त्याबाबत काय कार्यवाही अनुसरायची ती प्रारुप प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडतीच्या वेळी सूचना करण्यात येतील, असे आयोगाने कळविले आहे. यादरम्यानच्या काळात आरक्षणाबाबत काही वेगळा निर्णय झाल्यास तो सोडतीच्या वेळी अनुसरता येईल, असेच अप्रत्यक्षरित्या यातून सूचित करण्यात आले आहे.
८ नगरपालिकांत पडघम...
जिल्ह्यातील उस्मानाबादसह कळंब, भूम, परंडा, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा व मुरुम या आठही नगरपालिकांची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे येथील कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सोमवारपासून सुरु होणार आहे. दरम्यान, वाशी व लोहारा नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपुष्टात आल्याने तेथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यांचे प्रारुप आराखडे मंजूरही झाले आहेत. आता या नगरपंचायतींच्या निवडणुका नगरपालिकांसोबतच होणार की त्यापूर्वीच होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.