कोरोना उपाययोजनांबाबत पालिका उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:31 AM2021-05-24T04:31:03+5:302021-05-24T04:31:03+5:30
उमरगा : शहरात कोरोना परिस्थिती गंभीर असताना पालिका प्रशासनाकडून मात्र कसल्याचे उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे चित्र आहे. याउलट शिवसेनेसह ...
उमरगा : शहरात कोरोना परिस्थिती गंभीर असताना पालिका प्रशासनाकडून मात्र कसल्याचे उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे चित्र आहे. याउलट शिवसेनेसह इतर पक्ष संघटनांकडून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शहरात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला असून, उपजिल्हा रुग्णालयासह खासगी कोविड सेंटरमध्ये शेकडो कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्यास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले जे आजतागायत सुरू आहे. या कालावधीत पालिकेकडून केवळ कारवाईसाठी आणि कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या अंत्यविधीसाठी पथक नियुक्तीव्यतिरिक्त ना कोणती मोहीम राबविली गेली, ना प्रबोधन कार्यक्रम झाले. सध्या शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गल्लोगल्लीत गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे डास व डुकरांचा त्रास वाढलेला आहे. यामुळे कोरोनाकाळात इतर साथींच्या रोगाचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या कोरोनामुळे इतर आजारांवर उपचार करण्याइतपत आरोग्य व्यवस्था सक्षम राहिली नाही. याची कोणतीही जाणीव पालिका प्रशासनाला राहिली नसल्याचे दिसून येत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
मागील वर्षी संपूर्ण शहर निर्जंतूक करण्यासाठी औषध खरेदी करण्यात आली. परंतु, फवारणी कुठे केली, असा सवालही शहरवासियांतून उपस्थित होत आहे. यावर्षीही फवारणीसाठी दीड हजार लीटर औषधांची खरेदी झाली. परंतु, ही फवारणी फक्त शहरातील सरकारी कार्यालये, कोविड सेंटर या ठिकाणीच केली जात असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी मदार शेख यांनी दिली. दरम्यान, एकीकडे उपाययोजनांबाबत पालिका उदासीन असतानाच दुसरीकडे शिवसेना व युवा सेनेने मात्र शहर निर्जंतूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते हे शहरातील प्रत्येक वार्डात घरोघरी फवारणी करीत आहेत. किरण गायकवाड, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, युवासेनेचे योगेश तपसाळे, शरद पवार, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, संतोष सगर, ओम जगताप आदींसह कार्यकर्ते यात अग्रेसर आहेत.
कोट........
मागील वर्षी शासनाकडून शहरात फवारणीचे आदेश आले होते. त्यानुसार शहरात फवारणी करण्यात आली. परंतु, दुसऱ्या लाटेत तसे कोणतेही आदेश आलेले नाहीत. आदेश आल्यास फवारणी केली जाईल. त्याचबरोबर शहरातील साफसफाई करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेणार असून, आगामी आठवडाभरात शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावू.
- रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी
पालिकेतील सत्ताधाऱ्यांना शहरातील प्रश्नांचे काहीही देणेघेणे नाही. कोरोना काळात जनतेच्या आरोग्याचा प्रश्न एवढा गंभीर बनलेला असताना उपाययोजना केले गेल्या नाहीत. आम्ही शहरात जंतूनाशक फवारणी, स्वच्छता करण्याबाबत सूचवूनही गांभीर्याने घेतले नाही. शहरात सर्वत्र अस्वच्छता असून, त्याकडे पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
- संजय पवार, नगरसेवक, राष्ट्रवादी
फोटो- उमरगा शहरात जंतूनाशक फवारणी करून घेताना किरण गायकवाड, शरद पवार, योगेश तपसाळे आदी