पाचव्या माळेनिमित्त तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 01:52 PM2020-10-21T13:52:14+5:302020-10-21T13:55:46+5:30
नवरात्रातील पाचव्या माळेनिमित्त श्री तुळजाभवानीची विशेष मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : शारदीय नवरात्रातील बुधवारी पाचव्या माळेनिमित्त येथील श्री तुळजाभवानी देवीची विशेष मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.
तत्पूर्वी पहाटे श्री तुळजाभवानीची चरण तीर्थ झाले. यानंतर सकाळी सहा वाजता पंचामृत अभिषेक घाट होऊन श्री तुळजाभवानीस जलाभिषेक, दुग्धअभिषेक व पंचामृत अभिषेक घालण्यात आले. यानंतर नैवेद्य, धुपारती, अंगारा हे दैनंदिन विधी झाल्यावर भोपे पुजारी दिनेश परमेश्वर, अतुल मलबा, समाधान परमेश्वर, संजय सोंजी, सचिन परमेश्वर व शुभम कदम या भोपी पुजारी बांधवांनी तुळजाभवानीची विशेष मुरली अलंकार महापूजा मांडली.
या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री तुळजाभवानी मातेच्या अंगावर विविध प्रकारचे ऐतिहासिक सुवर्ण अलंकार, हिरे, मोती, पाचू यांचे दागिने घालून सजविण्यात आले होते. श्री तुळजाभवानी दोन्ही हातात मुरली धरुन मुखी लावून वाजवीत असून, मस्तकी मळवटात गोल लालटिळयात माऊली गंध लावण्यात आले होते. अशा प्रकारच्या कृष्णरुपी अवतारात तुळजाभवानी महिषासुराशी युद्धाला सामोरे जाते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळची अभिषेक पूजा झाल्यानंतर श्री तुळजाभवानीचा सिंह या वाहनावर छबिना काढण्यात आला. यावेळी उपस्थितांनी ‘आई राजा उदे उदे सदानंदीचा उदो उदो’ या गजरात मंदिर प्रदिक्षणा पूर्ण केली. यादरम्यान प्रक्षाळपूजा पार पडली. यावेळी महंत, व्यवस्थापक तहसीलदार सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, जयसिंग पाटील, भोपे पुजारी, पाळेकरी पुजारी, सेवेकरी, गोंधळी व मंदिर कर्मचारी उपस्थित होते.