खुनाचा बदला खुनाने घेतला; शेतातील पाण्यासाठी भावकीत राडा, बापलेकासह तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:52 IST2025-01-07T11:52:05+5:302025-01-07T11:52:13+5:30
वाशी तालुक्यातील बावी (जि. धाराशिव) येथे आप्पा काळे व भाग्यवंत काळे या चुलत भावांमध्ये शेतातील विहिरीचे पाणी घेण्यावरून वाद होता.

खुनाचा बदला खुनाने घेतला; शेतातील पाण्यासाठी भावकीत राडा, बापलेकासह तिघांचा मृत्यू
वाशी/येरमाळा (जि. धाराशिव) : शेतातील विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरून बावी येथे भावकीतीलच दोन गटांत तुफान राडा झाला. चाकू, कत्ती-कोयत्याने जबर हाणामारी झाल्याने बाप-लेकासह एकूण तिघांचा मृत्यू या घटनेत झाला आहे. एक महिला धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून १५ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच जणांना ताब्यातही घेतले.
वाशी तालुक्यातील बावी (जि. धाराशिव) येथे आप्पा काळे व भाग्यवंत काळे या चुलत भावांमध्ये शेतातील विहिरीचे पाणी घेण्यावरून वाद होता. रविवारी सायंकाळी हा वाद पुन्हा पेटला. पिकांना पाणी कमी पडत असल्याने आप्पा काळे यांनी भाग्यवंत काळे यांना पाणी देण्यास नकार दिल्याने या दोन्ही गटांत हाणामारी झाली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या हाणामारीत सुनील परमेश्वर काळे (२१) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला धाराशिवच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा रात्री मृत्यू झाला. ही माहिती कळताच भाग्यवंत काळे यांच्या गटाने आप्पा काळे यांच्या कुटुंबावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हल्ला चढवला. घरातील आप्पा भाऊ काळे (७०), त्यांचा मुलगा परमेश्वर आप्पा काळे (२२) व पत्नी वत्सला आप्पा काळे यांना जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत आप्पा काळे यांचा जागीच मृत्यू झाला तर, परमेश्वर काळे याचा वाशी रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर जखमी वत्सला काळे यांना उपचारासाठी धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाकू, कोयते, दगडांनी मारहाण
या घटनेत हल्लेखोर गटांकडून चाकू, कत्ती-कोयते, दगडांचा वापर करण्यात आला. हाणामारीची घटना कळताच येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
खुनाचा बदला खुनाने घेतला
सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आप्पा काळे गटाकडून झालेल्या मारहाणीत सुनील काळे याचा मृत्यू झाला. रुग्णालयात तो मृत पावल्याचे कळताच भाग्यवंत काळे गटाने हल्ला करुन आप्पा काळे यांच्यासह त्यांचा मुलगा परमेश्वर यांचा खून केला.
१५ जणांवर गुन्हे दाखल
या घटनेत परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. मयत आप्पा काळे यांचा मुलगा राहुल काळे याच्या फिर्यादीवरुन १० जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तर मयत सुनील काळे गटाकडून वंदना भाग्यवंत काळे यांच्या तक्रारीवरून ५ जणांवर गुन्हा नोंद झाला.