घात की अपघात! पुरुषासह दोन महिलांचे मृतदेह आढळले पळस निलेगाव तलावात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:35 IST2025-01-28T17:30:37+5:302025-01-28T17:35:01+5:30
तुळजापूर तालुक्यातील बाभळगावजवळील घटना

घात की अपघात! पुरुषासह दोन महिलांचे मृतदेह आढळले पळस निलेगाव तलावात
अणदूर (जि.धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पळस निलेगाव प्रकल्पाच्या तलावावरील पुलाखाली पाण्यावर तरंगताना तिघांचे मृतदेह सोमवारी दुपारी आढळले आहेत. यामध्ये दोन महिला व एक पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, येथून एक दुचाकीही पोलिसांनी बाहेर काढली असून, घात की अपघात, यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.
सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बाभळगाव तलावावरील पुलाखाली पाण्यावर तिघांचे मृतदेह तरंगताना काही नागरिकांना आढळून आले. यानंतर नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृतदेहांच्या अवस्थेवरून ते दोन दिवसांपूर्वी पाण्यात बुडाले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली. त्यांची ओळख पटवली असता हे तिघेही उमरगा तालुक्यातील मुरुम येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. आयुब नदाफ (४५), जया लक्ष्मण कांबळे (३०), रेशमा होडगी (३२) अशी या मृतांची नावे आहेत. या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नाही. दोन दिवसापूर्वी ही तिघेही गावातून दुचाकीवरून गेल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दुचाकीसह कोसळल्याचा अंदाज
बाभळगाव येथील पुलाचे काम अर्धवट आहे. याच पुलावर तीन महिन्यांपूर्वी एक एसटी खाली कोसळताना बचावली होती. तर याच पुलावर दोन महिला शिक्षिकांना आपला प्राण गमवावा लागला. आता पुन्हा याच ठिकाणी ही घटना घडली आहे. येथील पुलाला कठडा नसल्यामुळे या घटनेतील तिघेही दुचाकीसह खाली कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दुचाकीही पाण्याबाहेर काढली आहे.