लघुशंका केल्याच्या कारणावरून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 08:33 PM2020-08-22T20:33:38+5:302020-08-22T20:35:00+5:30
६ जणांवर गुन्हा दाखल
तेर (जि़ उस्मानाबाद) : बुकनवाडी येथील सुरेश अरुण काळे (२०) या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला होता. मात्र, लघुशंका केल्याच्या कारणावरून त्याचा खून करून मृतदेह लटकविल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली. या अनुषंगाने शुक्रवारी पहाटे ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
उस्मानाबाद तालुक्यातील बुकनवाडी येथील सुरेश काळे याने गावातीलच महिलेसमोर लघुशंका केली होती़ त्याचा राग धरून पांडुरंग वाकुरे, बालाजी वाकुरे, पोपट वाकुरे, योगेश वाकुरे, समाधान वाकुरे व अंकुश बुकन यांनी अरुण काळे यांच्या शेतात मारहाण करून त्याचा खून केला़ नंतर त्याचे प्रेत झाडाला लटकविले, अशी तक्रार मयताच्या आईने केली आहे़ त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती़ आरोपींवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा निर्णय त्यांनी पोलिसांकडे बोलून दाखविला़
पोलीस अधिकाऱ्यांनी काढली समजूत
गुरुवारी सायंकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेऊन समजूत काढली़ तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला़ मात्र, तो घरी नेऊन तसाच ठेवण्यात आला़ ही बाब समजल्यानंतर मयताच्या आईच्या तक्रारीवरून आरोपींवर खुनाचा व सोबतच अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला़ जवळपास ४८ तासांच्या अवधीने तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले़