परंड्यात मुसळधार, उस्मानाबादेत चौघे वाहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:36+5:302021-07-11T04:22:36+5:30
उस्मानाबाद / समुद्रवाणी : उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. परंडा मंडळात मुसळधार पाऊस झाला. येथे ...
उस्मानाबाद / समुद्रवाणी : उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. परंडा मंडळात मुसळधार पाऊस झाला. येथे १२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर १४ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, उस्मानाबाद तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांत चौघे जण वाहून गेले होते. यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे, तर दोघे अजूनही बेपत्ता आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील झालेल्या जोरदार पावसामुळे समुद्रवाणी-लासोना दरम्यान असलेल्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक कार वाहून गेली. यात मेंढा येथील गोवर्धन विष्णू ढोरमारे व तुकाराम विश्वनाथ कांबळे प्रवास करीत होते. त्यापैकी चालक तुकाराम कांबळे याने कारमधून उडी मारून पोहत जीव वाचविला. त्याने काही वेळाने जमलेल्या लोकांना ढोरमारे हे वाहून गेल्याचे सांगितले. ही माहिती बेंबळी ठाण्याचे सपोनि मच्छींद्रनाथ शेंडगे यांना कळविण्यात आली. त्यांनी लासोना येथील पोलीस पाटील ज्योतीराम काटे यांना गावाच्या बाजूने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. रात्रीच्या अंधारात पोलीस पाटील व निखिल घुले, इब्राहिम शेख, अब्दुल्ला मेंडके, समीर मेंडके, महेश पवार, शफिक मोगल, श्रावण भोसले शोधमोहीम सुरू केली. तेव्हा काटेरी बाभळीच्या बनात ढोरमारे अडकलेले दिसून आले. मानवी साखळी करून त्यांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, येथूनच पाणी पाहण्यासाठी गेलेला एक व्यक्ती पाण्यात वाहून गेला. त्या व्यक्तीच्या नावाची खात्री झालेली नाही. या व्यक्तीचा शोध लागलेला नाही. याशिवाय, कनगरा येथील युवक समीर युनीस शेख (२७) हा उस्मानाबाद येथून गावाकडे परतत असताना, बोरखेडा येथील पुलावरून मोटारसायकलसह वाहून गेला. आपत्ती व्यवस्थापनच्या पथकास त्याची दुचाकी सापडली. मात्र, युवकाचा शोध लागलेला नाही.
मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस उस्मानाबादला...
मराठवाड्यात शनिवारी सकाळपर्यंत १८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर एका मंडळात मुसळधार पाऊस झाला आहे. या १९ पैकी १५ मंडळ हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. एकमेव मुसळधार पावसाची नोंद झालेले मंडळ हे परंडा (जि.उस्मानाबाद) असून, येथे १२८ मिमी पाऊस झाला. याशिवाय, जिल्ह्यातील १४ अन्य मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे.