Video: मनमोहक! नळदुर्ग किल्ल्यावरील नर-मादी धबधब्याची पर्यटकांना भुरळ; परिसर गर्दीने फुलला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 03:59 PM2022-08-04T15:59:27+5:302022-08-04T16:04:30+5:30

नर-मादी धबधबा पाहण्यासाठी गुरूवारी सकाळपासूनच पर्यटकांनी गर्दी केली आहे.

Nar-Madi waterfall of Naldurg Killa attracts tourists; Bori Dam is overflowing | Video: मनमोहक! नळदुर्ग किल्ल्यावरील नर-मादी धबधब्याची पर्यटकांना भुरळ; परिसर गर्दीने फुलला

Video: मनमोहक! नळदुर्ग किल्ल्यावरील नर-मादी धबधब्याची पर्यटकांना भुरळ; परिसर गर्दीने फुलला

googlenewsNext

- पांडूरंग पाेळे
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद)
-पुष्य व आश्लेषा नक्षत्राच्या सरी सातत्याने कोसळत असल्याने येथील बोरी धरण तुडूंब भरले. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर किल्ल्यातील नर-मादी धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. हे दृष्य आपल्या डाेळ्यांत साठविण्यासाठी पर्यटक गुरूवारी सकाळपासूनच गर्दी करू लागले आहेत.

३ ऑगस्ट रोजी आश्लेषा नक्षत्राच्या पावसाला सुरुवात झाली. बोरी नदीपात्र व उगम परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे बोरी धरणात ३३.७७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाल्याने धरण तुडूंब भरले. दरम्यान, धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्यामुळे हे पाणी बाेरी नदीच्या पात्राद्वारे किल्ल्यातील साठवण तलावात येते. या साठवण तलावाच्या बांधावर जास्तीच्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी दोन सांडवे सोडण्यात आले आहेत. या दाेन्ही सांडव्यातून सध्या पाणी ओसंडून वाहत आहे. कोसळणारे पाणी सुमारे ७० फुटांवरून कोसळत असल्याने प्रवाह फेसाळलेला व पांढरा शुभ्र दिसताे. हा कृत्रिम नर-मादी धबधबा पाहण्यासाठी गुरूवारी सकाळपासूनच पर्यटकांनी गर्दी केली आहे.

भव्य तटभिंती अन् खंदक...
बालाघाट डोंगराच्या माथ्यावर बहमनी काळात इ.स. १३५१ ते १४८० दरम्यान सुमारे १२६ एकरवर नळदुर्ग किल्ला दगडाने बांधण्यात आला आहे. या किल्ल्यात रणमंडळ, उपली बुरुज, बारा दरी, जामा मशिद, राणी महाल, मच्छली तलाव, हत्ती दरवाजा, टेलर कोठी, पाणचक्की, तळघर, अंबारखाना, बारूत खाना, जेल आदी वास्तू पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत. किल्याच्या संरक्षणार्थ सभोवताली तटबंदी असून तटबंदीस भक्कम असे ११४ बुरुज आहेत. सध्या या किल्ल्याचे संवर्धन सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉन ही कंपनी करीत आहे.

पाणी महल...
किल्ल्यातील बोरी नदी पात्रावर कोरीव दगडाचा बंधारा बांधून साठवण तलाव तयार करण्यात आला आहे. तर विस्तीर्ण अशा बंधाऱ्यात पाणी महल बांधलेले आहे. या महालाच्या छतावर तलावातील जास्तीच्या पाण्याचा विसर्ग व्हावा म्हणून दोन सांडवे सोडण्यात आले असून त्या सांडव्यातून विसर्ग होणाऱ्या पाण्याची उंची कमी जास्त करून त्यास नर-मादी धबधबा असे नामाभीधान करण्यात आले आहे.

Web Title: Nar-Madi waterfall of Naldurg Killa attracts tourists; Bori Dam is overflowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.