तुळजाभवानी मंदिरात घटस्थापनेने नवरात्र सुरु
By चेतनकुमार धनुरे | Published: October 15, 2023 01:20 PM2023-10-15T13:20:06+5:302023-10-15T13:20:32+5:30
आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदेचा गजर करीत हजारो भाविकांनी या सोहळ्याचे दर्शन घेतले.
चेतन धनुरे
तुळजापूर (जि.धाराशिव) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या सिंह गाभाऱ्यात मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे दांम्पत्याच्या हस्ते दुपारी पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदेचा गजर करीत हजारो भाविकांनी या सोहळ्याचे दर्शन घेतले.
रविवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास श्री तुळजाभवानीची घोरनिद्रा संपुष्टात आल्यानंतर भोपी पुजाऱ्यांनी देवी मूर्तीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापणा केली. यानंतर पारंपारिक धार्मिक विधी होऊन विशेष पंचामृत अभिषेक पूजा करुन भाविकांना देवी दर्शनास सोडण्यात आले. सकाळी सहा वाजता देवीची अभिषेक घाट होऊन नित्योपचार पंचामृत अभिषेक पार पडले.
महंत व भोपे पुजारी यांनी देवीस नैवेद्य दाखवून धुपारती करून अंगारा हे विधी पार पडले. यावेळी तुळजाभवानीची विशेष अलंकार पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानीची शासकीय आरती करून गोमुख तीर्थाजवळील घटकलशाची विधिवत पूजा केली व हे घटकलश सवाद्य मंदिरात आणण्यात आले. सिंह गाभाऱ्यात घटकलश वावरीत ठेवून पारंपारिक पद्धतीने त्याचे पूजन करून घटस्थापना करण्यात आली. पुढील आठ दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक विधीसाठी यावेळी ब्रह्मवृंदास ओम्बासे दांम्पत्याच्या हस्ते वर्णी देण्यात आली. यानंतर मंदिरातील उपदेवतांच्या ठिकाणीही घटस्थापना करण्यात आली.