शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी आक्रमक; तामलवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको
By गणेश कुलकर्णी | Published: August 25, 2023 08:23 PM2023-08-25T20:23:33+5:302023-08-25T20:23:49+5:30
शासनाने दुष्काळ जाहीर करावा तसेच थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करावी
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, थकीत पीकविमा वाटप करावा, कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी टोल नाक्यावर शुक्रवारी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तालुक्यात २५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने पिके करपून चालली आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर करावा तसेच थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करावी, कांदा निर्यातीवर लादलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे, आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांसमवेत तालुकाध्यक्ष धैर्यशिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यात तुळजापूर विधानसभा अध्यक्ष शिवाजी सावंत, अशोक जाधव, सिकंदर बेगडे, ग्रा. पं. सदस्य सतीश माळी, हनमंत गवळी, तौफिक शेख, सत्यजित देशमुख, महेश गुंड, अमोल पाटील, आनिल शिंदे, पंडित काळे, संदीप गंगणे, बबन ढगे, प्रदीप साळुंके, नजीब काझी, किसन पांडागळे याच्यासह तामलवाडी, सुरतगाव, नांदुरी, मांळुब्रा, काटी आदी गावातील शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चौकट
गळ्यात घातल्या कांद्याच्या माळा
यावेळी कांदा निर्यातीवर आकारले जाणारे शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी कार्यकर्ते गळ्यात कांद्याच्या माळा घालून रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनामुळे अर्धा तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.