दारूबंदीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:37 AM2021-08-12T04:37:01+5:302021-08-12T04:37:01+5:30
मुरूम : शहरातील अवैद्य दारू विक्री बंद करून घरकुल आवास योजनेतून लाभार्थींचे कपात केलेले पंधरा हजार रुपये द्यावेत, यासह ...
मुरूम : शहरातील अवैद्य दारू विक्री बंद करून घरकुल आवास योजनेतून लाभार्थींचे कपात केलेले पंधरा हजार रुपये द्यावेत, यासह शहरात सुरळीत व शुध्द पाणीपुरवठा करावा आणि स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी या मागणीसाठी मुरूम शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेसमोर मंगळवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. या उपोषणाला भाजपसह शिवसेना आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननेही पाठिंबा देत सहभाग नोंदविला.
शहरातील विविध मूलभूत सुविधांसह इतर मागण्यांसाठी अनेकवेळा पालिकेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निवेदन देण्यात आले. परंतु पालिका प्रशासनाकडून समस्या सोडण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत मंगळवारी उपोषण करण्यात आले. यावेळी दारूबंदीचा ठराव घेऊन शहरातील अवैद्य दारू विक्री बंद करावी तसेच प्रधानमंत्री व रमाई घरकुल आवास योजनेतील कपात केलेले पंधरा हजार रुपये लाभार्थींना तत्काळ परत द्यावेत, खुल्या नाट्यगृहाच्या जागी सांस्कृतिक सभागृह उभारावे, शहरातील कन्या प्रशाला नेहरूनगर, महादेवनगर, किसान चौक या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करावी, संभाजीनगर, इंगोले गल्ली, नेहरूनगर या भागात शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करावा, शहरातील भूमिहीन शेतमजुरांना शासन निर्णयाप्रमाणे जॉबकार्ड तत्काळ वाटप करावेत आदी मागण्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केले आहेत.
आंदोलनस्थळाला शहरातील भारतीय जनता पक्षाचे श्रीकांत मिनियार, भाजपचे शहराध्यक्ष गुलाब डोंगरे, शिवसेनेचे चंद्रशेखर मुदकण्णा, नगरसेवक अजित चौधरी, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने उपोषणाला पाठिंबा देत सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहर अध्यक्ष विठ्ठल पाटील, युवकचे शहराध्यक्ष बाबा कुरेशी, बशीर कागदी, सागर बिराजदार, जोतिबा शिंदे, जावेद ढोबळे, बालाजी मंडले, अक्षय शिंदे आदी सहभागी झाले होते.
कोट......
शहरात एक दिवसाआड शुध्द पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागात नळ योजनेद्वारे तर काही भागात कुपनलिकेद्वारे पाणीपुरवठा होतो. शहरातील पाइपलाइन जुनी झाली असून, ज्या भागात पाणी जात नाही तिथे कुपनलिका आहेत. घरकुल योजनेत अनुदान घेतलेल्या लाभार्थींनी स्वच्छतागृह बांधावे यासाठी ही रक्कम कपात करण्यात आली होती. अनेक जणांनी दोन वेळा स्वच्छतागृहाच्या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे एका वेळेस एकाच स्वच्छतागृहाच्या बांधकामाचा लाभ घेणे आवश्यक आहे. शहरात पाच ते सहा स्वच्छतागृहाची व्यवस्था असून, नागरिक याचा व्यवस्थित वापर करत नसल्याने दुरवस्था झाली आहे. सध्या बसस्थानक व बाजारपेठत असलेले स्वच्छतागृह वापरत आहेत.
- हेमंत किरुळकर, मुख्याधिकारी