उस्मानाबादच्या राष्ट्रवादीला आता लातूरचा टेकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:24 AM2020-12-27T04:24:03+5:302020-12-27T04:24:03+5:30
चेतन धनुरे / उस्मानाबाद : जिल्ह्यातील राष्ट्रवादीला सध्या एकमुखी नेतृत्व नसल्याने पदाधिकार्यांत चांगलेच नाराजीनाट्य रंगले आहे. नूतन पदाधिकार्यांच्या निवडीही ...
चेतन धनुरे / उस्मानाबाद : जिल्ह्यातील राष्ट्रवादीला सध्या एकमुखी नेतृत्व नसल्याने पदाधिकार्यांत चांगलेच नाराजीनाट्य रंगले आहे. नूतन पदाधिकार्यांच्या निवडीही याचमुळे लांबणीवर पडलेल्या दिसतात. त्यांच्यातील रुसवे-फुगवे दूर करण्यासाठी पक्षाने आता राज्यमंत्री संजय बनसोडे यांना उस्मानाबादच्या मैदानात उतरविले आहे. शनिवारी सकाळपासून सुरु झालेल्या त्यांच्या बैठकी सायंकाळ उलटली तरी संपल्या नाहीत.
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले वर्चस्व निर्माण झाले होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या माध्यमातून पक्षाने जिल्हाभर जाळे विणले. मात्र, सध्या ते राजकारणात सक्रीय नाहीत. पुढे त्यांचे पुत्र आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी नेतृत्व हाती घेतले. या कुटूंबाचा पक्षावर एकहाती अंमल होता. त्यामुळे नाराजी असली तरी ती फारशी कधी बाहेर आली नाही. दरम्यान, आ.पाटील यांनी भाजपात प्रवेश घेतल्याने पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. माजी आ.राहूल मोटे यांच्याकडे धुरा सोपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते त्यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे पक्षाने जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार या जुन्या सहकार्यांना मैदानात आणून नव्याने बांधणीचा प्रयत्न सुरु केला. मात्र, नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेले नेते व काही जुन्या कार्यकर्त्यांना गोरे, बिराजदारांचे जणू नेतृत्व पटलेच नाही. यातूनच सातत्याने अंतर्गत खटके उडू लागले आहेत. कळंब पालिकेत याचा प्रत्यय नुकताच आला. येथील नगरसेवकांनीच जिल्हाध्यक्षांनी त्यांच्यावर केलेल्या कार्यवाहीचा जाहीरपणे निषेध केला. तर दुसरीकडे उस्मानाबाद पालिकेतील तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत असलेल्या राणाजगजितसिंह पाटील समर्थक नगरसेवकांनीही पक्षाच्या बैठकीवरच आक्षेप घेत विद्यमान पदाधिकार्यांवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निवडीचाही पुरता घोळ या कलह, तक्रारींमुळे झाला आहे. यामुळे शेवटी पक्षाने राज्यमंत्री संजय बनसोडे यांना उस्मानाबादच्या मैदानात उतरविले आहे. शनिवारी बनसोडे यांनी उस्मानाबादेत तक्रारी व पदाधिकार्यांची मते जाणून घेण्यासाठी मॅरेथॉन बैठका घेतल्या. सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरु झालेल्या बैठकींचा दौर सायंकाळी ७ वाजेनंतरही सुरुच होता. या बैठकीनंतर तरी पक्षांतर्गत नाराजीचा तिढा सुटतो का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
चौकट...
उस्मानाबादची राष्ट्रवादी स्ट्राँग असल्याने येथील नेते पूर्वी लातुरात लक्ष द्यायचे. किंबहुणा लातूरची जबाबदारीही त्यांच्याकडेच असायची. पदाधिकारी निवड, निवडणुकांत उस्मानाबादचे पदाधिकारी लातुरात ठाण मांडत. आता उलटी गंगा वाहू लागली आहे. उस्मानाबादेतील निवडी, निवडणुकांत लक्ष देण्याची वेळ लातूरच्या नेतृत्वाकडे आली आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांना याबाबतीत महत्वाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.