तुळजापूरजवळ कच्च्या तेलाचा टँकर उलटला; नागरिकांची कडाक्याच्या थंडीतही तेलासाठी महामार्गावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 06:24 PM2018-12-19T18:24:47+5:302018-12-19T18:26:06+5:30
नागरिकांनी आळून घट्ट झालेले तेल नेण्यासाठी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती़
अणदूर ( उस्मानाबाद ) : सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने कच्चे तेल घेऊन जाणारा टँकर बुधवारी पहाटे तुळजापूर तालुक्यातील चिवरी पाटीजवळ पलटी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आळून घट्ट झालेले तेल नेण्यासाठी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती़
कच्चे तेल घेऊन एक टँकर (क्ऱएम़एच़४६- एफ़ ५४८१) सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने जात होता़ हा टँकर तुळजापूर तालुक्यातील चिवरी पाटी येथील वत्सलानगर जवळ आला असता अचानक पलटी झाला़ टँकर पलटी झाल्याने हजारो लिटर कच्चे तेल रस्त्यावर सांडले़ रस्त्यावर पडलेले कच्चे तेल थंडीमुळे आळून घट्ट झाले़ तेलाचा टँकर उलटल्याची ल्याची माहिती मिळताच कडाक्याच्या थंडीतही वत्सलानगर वस्तीवरील शेकडो महिला, पुरूषांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ घरून आणलेल्या भांड्यात मिळेल तितके घट्ट तेल घेऊन जो तो घराकडे पळून जात होता.
दरम्यान, अपघातामुळेमहामार्गावर पडलेले तेल हे कच्चे तेल आहे़ त्यावर प्रक्रिया न झाल्याने ते खाण्यास योग्य नसल्याची चर्चा रंगली होती़ घटनास्थळावर नागरिक तेल नेत असताना पोलिसांसह इतर कोणीही त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला नाही, हे विशेष़ अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती़ त्यानंतर तेल सांडलेल्या मार्गाजवळ सुरू असलेल्या रस्ता कामातील सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरळीत करण्यात आली़ या घटनेची नळदुर्ग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.