जलसाठे वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:41+5:302021-07-11T04:22:41+5:30
भूम : तालुक्यात शुक्रवारी पाचही मंडळात पावसाने कमी-अधिक हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरिपास हा ...
भूम : तालुक्यात शुक्रवारी पाचही मंडळात पावसाने कमी-अधिक हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरिपास हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. परंतु, तालुक्यातील जलसाठ्यात पाणीसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
तालुक्यात खरीप पेरण्यांनंतर १५ दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतित होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगले पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात खरिपाचे ४९ हजार ३८६ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना मान्सून वेळेत सक्रिय झाल्याने प्रत्यक्षात ५१ हजार २०६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यावर पिकाची उगवण होऊन पिके वाढीच्या अवस्थेत असताना तब्बल १५ दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. ७ जुलैपासून पावसाने वापसी केल्याने तूर्तास खरीप पिकास जीवदान मिळाले आहे. तालुक्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत आंबी मंडळात १७.५०, माणकेश्वर ३६.३०, भूम २९.८०, वालवड ४९.३० तर ईट मंडळात २३ मिमी पावसाची नोंद झाली.
तालुक्यात १ ते १० जुलै या दहा दिवसांत भूम मंडळात सर्वाधिक ८९.४० मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल माणकेश्वर मंडळात ८४.९०, वालवड ७४.८० मिमी, तर अंबी व ईट मंडळात प्रत्येकी ४९.८० मिमी पाऊस झाला आहे. एकूणच अजूनही ईट, वालवड व आंबी मंडळात पावसाचे प्रमाण कमी असून, भूम व माणकेश्वर मंडळात समाधानकारक दिसून येत आहे. शिवाय, तालुक्यातील प्रकल्प अजूनही कोरडे असून, यातील पाणीपातळी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.