विवाह नोंदणी प्रमाणपत्र हवेय? अगोदर वृक्ष लावा; हगलूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
By गणेश कुलकर्णी | Published: August 21, 2023 04:28 PM2023-08-21T16:28:49+5:302023-08-21T16:36:34+5:30
गावकऱ्यांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे.
धाराशिव : गावातील नव्याने विवाह केलेल्या दाम्पत्याने विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या घरासमोर नवीन वृक्ष लागवड करून फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखविल्यानंतरच विवाह नोंदणीचा दाखला देण्याचा ठराव घेत तुळजापूर तालुक्यातील हगलूर ग्रामपंचायतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
हवा शुद्ध करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे आवश्यक आहे. झाडे आणि वनस्पती मानवी आरोग्यासोबतच पर्यावरणही निरोगी ठेवतात. ते हवामानावरही नियंत्रण ठेवतात. अधिक झाडे लावल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहते. हीच बाब लक्षात घेत तालुक्यातील हगलूर येथील सरपंच ॲड. जयपाल पाटील यांनी मांडलेल्या संकल्पनेतून नवदाम्पत्याने घरासमोर एक झाड लावून झाडाचा फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखवल्यानंतर विवाह प्रमाणपत्र देण्याचा ठराव घेण्यात आला. गावकऱ्यांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे.
यावेळी सरपंच ॲड. जयपाल पाटील, उपसरपंच महेश गवळी, ग्रामसेविका एस. एस. कदम, माजी सरपंच नालंदा पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अंकुश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब दराडे, रोजगार सेवक जयकुमार घुगे, संगणक परिचालक रफिक शेख, शिपाई आणि जलसुरक्षक दिनकर गवळी, ग्रामपंचायत सदस्य अलका पाटील, कौशल्याबाई घुगे, शीतल घुगे, रंजना पवार, संजय पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
वृक्षारोपण वाढणे महत्वाचे
गावामध्ये वृक्षारोपण होऊन चांगले वातावरण निर्माण होईल. तसेच आरोग्यदायक वातावरण राहील. उन्हाळ्यात उन्हाचा त्रास लोकांना जाणवणार नाही. यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. त्यामुळेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ‘एक झाड लावा आणि त्याचा फोटो ग्रामपंचायतीला दाखवा’ असा नियम लागू केला आहे. त्याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे.
- ॲड. जयपाल पाटील, सरपंच