अपघातग्रस्तांवर उपचारासाठी ‘ट्रॉमा केअर’ची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:25 AM2020-12-26T04:25:25+5:302020-12-26T04:25:25+5:30
कळंब : सोलापूर-धुळे, खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वाढल्याने व कळंब-लातूर, कळंब-ढोकी-तेर या मोठी वाहतूक असणाऱ्या मार्गावर नुतनीकरण होत ...
कळंब : सोलापूर-धुळे, खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वाढल्याने व कळंब-लातूर, कळंब-ढोकी-तेर या मोठी वाहतूक असणाऱ्या मार्गावर नुतनीकरण होत असल्याने कळंब तालुक्यातून वाहनांचा राबता वाढला आहे. परिणामी अपघातांची संख्याही वाढण्याची शक्यता गृहीत धरुन कळंब येथे अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी ट्राॅमा केअर सेंटर सुरु करण्याची मागणी होत आहे.
शासनाने कळंब ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला आहे. उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक इमारतीसाठी न. प. ने दीड एकर जागा देण्याचा ठराव मंजूर केला हा जागा हस्तांतरणचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर मागील काही महिन्यांपासून मंजुरीसाठी पडून आहे. त्याला कधी मुहूर्त लागेल हे खुद्द लोकप्रतिनिधी, अधिकारीही ठामपणे सांगू शकत नसल्याने कळंबचे उपजिल्हा रुग्णालय सध्या नावालाच असल्याची टिका होते आहे. इमारत नसल्याने भाैतिक सुविधा वाढिवण्यास प्रशासनास मर्यादा येत आहे. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा प्रश्नही उपस्थित होतो आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या वाढीव जागेचा तिढा सुटण्यास उशीर झाला तरी चालेल पण कळंबला उपघातग्रस्तांसाठी ट्राॅमा केअर सेंटर सुरु करण्याची मागणी आता जोर धरीत आहे. परवा खामगाव-पंढरपूर या महामार्गावर कळंब शहरानजीक झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका अपघातग्रस्ताचा मृत्यू तर केवळ वेळेवर उपचार न मिळाल्याने झाल्याचे समोर आले होते. अपघातात अनेकदा घरातील कर्ती, कमावती व जबाबदार मंडळींचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून कुटूंबे उघडी पडतात.
कळंब तालुक्यातून सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. खामगाव-पंढरपूर या महामार्गाचे कामही पूर्ण हाेत आले आहे जो कळंब शहरातून जातो. कळंब-लातूर व कळंब-ढोकी-तेर या मार्गाचे काम हायब्रीड ॲन्युटीमधून पूर्ण होते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या कळंब शहरामधून तसेच तालुक्यातील मुख्य मार्गावरुन वाहतूक वाढणार आहे. चांगले रस्ते हे अपघात कमी करण्यास, वाहतूक सुरळीत व अखंडपणे चालू रहावी यासाठी पूरक असले तरी ते अपघात रोखू शकणारे नाहीत. वाढणाऱ्या वाहतुकीमुळे होणारे संभाव्य अपघात लक्षात घेता प्रशासनाने या अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, त्यांचे प्राण वाचावे यासाठी कळंब येथे ट्राॅमा केअर युनिट चालू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
‘ट्राॅमा केअर’ कळंबलाचं का?
कळंब येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे ट्रामा केअर सेंटरसाठी सहाय्यक सुविधा उपलब्ध होवू शकतात. कळंब हे केंद्रबिंदू धरले तर या भागात अपघात झाल्यास बार्शी, अंबाजोगाई व उस्मानाबाद येथे अपघातग्रस्तांना हलवावे लागते ज्याचे अंतर सरासरी ५० कि.मी. आहे व तेथपर्यंत जाण्यास किमान १ तासाचा वेळ लागतो. अपघातानंतर एवढा वेळ गेल्याने उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कळंबपासून २५-३० किमीच्या परिसरात अपघात झाला तरी कळंब येथील ट्रामा केअर मध्ये तुलनेने लवकर उपचार मिळू शकतील.
काय आहे ट्रामा केअर सेंटर?
ट्रॉमा केअर सेंटर हे कोणत्याही अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी कार्यान्वित केले जाते. यामध्ये सर्जन डाॅक्टर, ऑपरेशन थिएटर, सर्जिकल आयसीयू, प्राथमिक उपचार कक्ष, अत्याधुनिक यंत्रणा व वेगळ्या इमारतीचा समावेश असतो.
कोट.....
कळंब उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई, उस्मानाबाद अशा ठिकाणी पाठविले जाते. कळंब परिसरात अपघातांची संख्या पाहता येथे ट्राॅमा केअर सेंटरची गरज आहे. त्यामुळे रुग्णांची आवश्यक तपासणी करुन त्यांना येथेच उपचार मिळू शकतो व उपचारासाठीची धावपळ थांबू शकते.
- डाॅ. जीवन वायदंडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय