‘एमबीबीएस’धारक डाॅक्टर देता का डाॅक्टर; ५० टक्के आराेग्य केंद्रांना डाॅक्टरांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 04:43 PM2021-03-03T16:43:37+5:302021-03-03T16:47:15+5:30
‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांच्या तब्बल ५० टक्के जागा रिक्त आहेत. याचा आराेग्य सेवेवर विपरित परिणाम हाेऊ लागला आहे.
उस्मानाबाद : मध्यंतरी काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर सर्व काही सुरळीत हाेऊ लागले आहे, असे वाटत असतानाच पुन्हा काेराेना विषाणूने डाेके वर काढले आहे. रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेऊ लागली आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील आराेग्य यंत्रणेवर ताण येत आहे. असे असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद आराेग्य केंद्रातील ‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे ‘एबीबीएस’धारक डाॅक्टर देता का डाॅक्टर, असे म्हणण्याची वेळ आता खुद्द जिल्हा आराेग्य यंत्रणेवर येऊन ठेपली आहे.
काेराेनाचा उद्रेक वाढल्यानंतर शासनाने आराेग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला. या माध्यमातून भाैतिक सुविधा वाढल्या. उपकेंद्रांना ‘बीएएमएस’धारक डाॅक्टरही देण्यात आले आहेत. परंतु, दुसरीकडे ‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रांसाठी दाेन या प्रमाणे ८२ ते ८३ जागा मंजूर आहेत. काही वर्षांपूर्वी या जागा फुलफिल हाेत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आराेग्य सेवा मिळत हाेती. मात्र, ऐन काेराेना संकटाच्या काळात डाॅक्टरांची वानवा निर्माण झाली आहे. ‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांच्या तब्बल ५० टक्के जागा रिक्त आहेत. याचा आराेग्य सेवेवर विपरित परिणाम हाेऊ लागला आहे. यातून मार्ग काढण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आराेग्य विभागाने अनेक ठिकाणी एक एमबीबीसधारक व एक ‘बीएएमएस’धारक डाॅक्टर दिले आहेत. तरीही डाॅक्टरांची संख्या कमी पडत आहे. काही आराेग्य केंद्रांना एकही एमबीबीएसधारक डाॅक्टर नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी एखाद्या दगावलेल्या व्यक्तीस पाेस्टमार्टेमसाठी आणल्यास अनंत अडचणींना ताेंड द्यावे लागते. लगतच्या आराेग्य केंद्रातील डाॅक्टरांना पाचारण करावे लागते. अनेकवेळा नातेवाईकांना तासनतास ताटकळत बसावे लागते. अशावेळी शाब्दिक खटकेही उडतात. त्यामुळे वेळीच डाॅक्टर भरण्याची गरज आहे.
एक ‘एमबीबीएस’ व दुसरे ‘बीएएमएस’डाॅक्टर द्यावेत
जिल्हा परिषदेतील अनेक पदाधिकारी आपल्या मतदार संघातील प्राथमिक आराेग्य केंद्रास ‘एमबीबीएस’ डाॅक्टर मिळावेत, यासाठी आग्रही आहेत. परंतु, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. वडगावे यांच्याकडेही अन्य पर्याय नाहीत. दरम्यान, सध्या काही सदस्यांनी प्रत्येक आराेग्य केंद्रात एक ‘एमबीबीएस’ व दुसरे ‘बीएएमएस’डाॅक्टर द्यावेत, अशी सूचना मांडली आहे. ज्यामुळे डाॅक्टरांची चणचण कमी हाेईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावरही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी म्हटले.
पाठपुरावा सुरू
‘एमबीबीएस’ डाॅक्टर मिळावेत, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. नेहमी पत्रव्यवहार केला जात आहे. संबंधित डाॅॅक्टर उपलब्ध हाेताच, नियुक्ती देण्यात येईल.
-डाॅ. हणमंत वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी.