निष्काळजीपणा भोवला; कोर्टाकडून आर्थिक दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:33 AM2021-03-18T04:33:11+5:302021-03-18T04:33:11+5:30
येडशी येथील मिथुन भारत ओव्हाळ यांनी जीवितास धोका होईल, अशा रितीने वाहन चालवून वाहतूक नियमांचा भंग केला होता. याबाबत ...
येडशी येथील मिथुन भारत ओव्हाळ यांनी जीवितास धोका होईल, अशा रितीने वाहन चालवून वाहतूक नियमांचा भंग केला होता. याबाबत उस्मानाबाद ग्रामीण ठाण्यात त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. याप्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवून मंगळवारी ५०० रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली.
अन्य एका प्रकरणात मोहन शिवाजी खामकर यांना ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आठ दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्यावर आनंदनगर ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याचा गुन्हा दाखल होता, तर हगलूर येथील सचिन शिंदे यास तामलवाडी रस्त्यावर जीविताला धोका होईल, अशा पद्धतीने ऑटोरिक्षा रस्त्यातच लावल्यावरून गुन्हा दाखल केला होता. यात शिंदे यास न्यायालयाने बुधवारी २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सुनावणीस गैरहजर राहिल्याने दंड...
परंडा तालुक्यातील रोसा येथील दादाराव रामलिंग गव्हाळे हे एका गुन्ह्यात जामिनावर मुक्त झाले होते. नंतर मात्र, त्यांनी सुनावण्यांना हजेरी लावली नाही. समन्स बजावूनही दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात त्यांना २०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.