नवा कोरोना येतोय, तरीही नागरिक गाफिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:00 AM2021-02-18T05:00:40+5:302021-02-18T05:00:40+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश एप्रिलमध्ये झाला. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत येथे उशिरा लागण सुरु झाली असली तरी प्रसाराची गती मात्र ...
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश एप्रिलमध्ये झाला. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत येथे उशिरा लागण सुरु झाली असली तरी प्रसाराची गती मात्र सुपरफास्ट होती. त्यामुळेच जिल्ह्यात आजवर १७ हजारांहून अधिक जण कोरोनाबाधित झाले. बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असले तरी मृत्यूचे प्रमाण साडेतीन टक्क्यांवर आहे. नागरिकांतील बेफिकिरी, अपुरी आरोग्य व्यवस्था यामुळे मृत्यूचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबादला जास्त आहे. ही काळजीत भर टाकणारी बाब आहे. दरम्यान, अजूनही नियमितपणे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेतच. दररोज सरासरी १० ते १२ रुग्ण कोरोनाबाधित निघत आहेत. हे प्रमाण काहिसे कमी वाटत असले तरी सध्या नागरिकांचा सुरु असलेला मुक्त संचार लक्षात घेता तो वाढण्यास वेळ लागणार नाही. शिवाय, आरोग्य यंत्रणा अजूनही म्हणावी तितकी सक्षम झालेली नाही. डॉक्टर तसेच कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे, अपुर्या सोयी यामुळे पुन्हा उद्रेक झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे जिकिरीचे होऊन जाईल.
विना मास्क, मुक्त प्रवेश...
बुधवारी बसस्थानकात पाहणी केली असता नागरिकांकडून मास्क, सुरक्षित अंतराचे कोठेच पालन होत नसल्याचे दिसून आले. सध्या लग्नसराई सुरु असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. त्यात सुरक्षित अंतराला हरताळ फासला जात आहे. बसवर मोठ्या अक्षरात मास्क नसल्यास प्रवेश नसल्याचा संदेश कोरला आहे. मात्र, प्रत्यक्षात बोटावर मोजण्याइतक्याच लोकांकडे मास्क दिसून आला. तरीही सर्वांना विनाअडथळा प्रवेश मिळत होता.
बाजारपेठेतही नियमांना फाटा...
दुकाने सुरु करताना दकानदारांना सॅनिटायझर ठेवणे, सातत्याने दुकानाची स्वच्छता करुन घेणे, मास्कविना ग्राहकास प्रवेश द्यायचा नाही, अंतराचे पालन असे नियम घालून देण्यात आले होते. मात्र, शहरातील मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारला असता हे सर्व नियम आता कागदावरच राहिल्याचे दिसून आले. सॅनिटायझर ठेवले, मात्र वापर नाही. मास्कशिवाय व अंतराचे पालन न करता ग्राहक मुक्तपणे खरेदी करताना दिसून येत होते.
तर आता १ हजार दंड...
विनामास्क फिरल्यास यापूर्वी २०० रुपये दंड आकारला जात होता. मात्र, कोरोनाच्या उद्रेकाच्या भितीने व नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे हा दंड आता १ हजार रुपये करण्यात आला आहे. विनामास्क सापडल्यास खिश्याला मोठी कात्री आता लागेल. तसेच सोहळे, मेळावे, लग्नसमारंभावरही पुन्हा निर्बंध आणले जात आहेत. संख्येची मर्यादा ओलांडल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. शिकवण्यांचीही तपासणीहाती घेऊन नियमांचे पालनहोतेय का, याची चाचपणी केली जाणार आहे.