नऊ वर्षे उलटूनही महामार्ग होईना; सोलापूर-हैद्राबाद रस्त्यावर जीव झाले स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 04:30 PM2022-06-20T16:30:25+5:302022-06-20T16:31:17+5:30
या कामासाठी जवळपास तीनशे हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. मात्र, गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम अजूनही चालूच आहे.
उस्मानाबाद : सोलापूर ते हैद्राबाद या महामार्गावरील शंभर किमी अंतराचे ठिगळ नऊ वर्षे उलटूनही शिवले जात नाहिये. अपूर्ण उड्डाणपुले, उखडलेले डांबरीकरण धोकादायक क्रॉसिंगमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. असे असले तरी दोन ठिकाणी टोलवसुली मात्र जोमात सुरू आहे.
सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरीलउस्मानाबाद जिल्हा हद्दीतील खानापूर पासून कर्नाटक सिमेपर्यंतच्या शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणाच्या कामाची मूळ किंमत ९२२ कोटी आहे. २०११ पासून सर्वे सुरू झाला. २०१३ मध्ये कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सोलापूरच्या एसटीपीएल कंपनीने ठेका घेतला. या कामासाठी जवळपास तीनशे हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. मात्र, गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम अजूनही चालूच आहे. संथगतीने काम सुरू असल्याने डांबरीकरण सहा महिन्यात पुन्हा उखडून खड्डे पडायला सुरुवात होते. शिवाय, मुरूम मोड, आष्टामोड, जकेकूर चौरस्ता, मुळज फाटा, येणेगूर येथील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. नवीन डांबरीकरण उखडल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नियमित अपघात घडून येत आहेत. अपूर्ण काम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नसतानाही दोन वर्षापासून ईटकळ व तलमोड नाक्यावरून टोल वसुली जोरात सुरू आहे.
चार वर्षांनंतरही खामगाव-पंढरपूर प्रगतीपथावरच...
पश्चिम महाराष्ट्रास व्हाया मराठवाडा विदर्भाशी संलग्न करणाऱ्या साडेचारशे कोटी रुपयांच्या खामगाव-पंढरपूर महामार्गाचा २०१७ मध्ये श्रीगणेशा झाला. दोन वर्ष मुदतीच्या या कामास चार वर्ष लोटले तरी ते काम 'प्रगतीपथावर' असल्याने नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. कळंब तालुक्यातील येरमाळा घाटात रस्ता खोदून ठेवल्याने अपघात तर होत आहेतच. मात्र, वाहनांची गती मंदावल्याने चोरट्यांचे फावते आहे. सोलापूर सीमेवर बालाघाटाच्या शिरोभागी धुळे-सोलापूर कार्यान्वित झाला आहे. दुसरीकडे हायब्रीड ॲन्युइटी तत्त्वाचा 'टच' लाभलेल्या कळंब-ढोकीचे काम पूर्ण पण दर्जा 'सुमार' झाला आहे.