आधारकार्ड नाही, भिकाऱ्यांना लस देणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:32 AM2021-03-10T04:32:15+5:302021-03-10T04:32:15+5:30

तुळजापूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना या संसर्गामुळे संपूर्ण जगावर ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी आता लस उपलब्ध झाली असून, प्रशासनाकडून ...

No Aadhaar card, how to vaccinate beggars? | आधारकार्ड नाही, भिकाऱ्यांना लस देणार कशी?

आधारकार्ड नाही, भिकाऱ्यांना लस देणार कशी?

googlenewsNext

तुळजापूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना या संसर्गामुळे संपूर्ण जगावर ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी आता लस उपलब्ध झाली असून, प्रशासनाकडून टप्प्याने याचे लसीकरणदेखील करण्यात येत आहे. परंतु, यासाठी आधारकार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह भागविणाऱ्यांकडे आधारकार्ड किंवा इतर कुठलेही नसल्यास त्यांना लसीकरण कसे करणार, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले तीर्थक्षेत्र आहे. येथील श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मोठी गर्दी असते. यासोबतच पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक भिकारी तसेच भटकंती करणारे नागरिकही तुळजापुरात मोठ्या प्रमाणात दाखल होतात. सद्यस्थितीत तुळजापूर शहरात पन्नासपेक्षा अधिक भिक्षेकरी आहेत. विशेषत: यात्रा कालावधीत भिकाऱ्यांची, बेवारस, बेघर, भटकंती करणाऱ्या नागरिकांची संख्या दोनशेच्या आसपास पोहोचते.

शासनाने महामारी कोरोनावर लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्यांना हे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आले. सध्या ज्येष्ठांना ही लस देण्यात येत आहे. परंतु, यासाठी आधार कार्ड किंवा तत्सम पुरावे आवश्यक आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे पुरावे उपलब्ध नाहीत, त्यांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता भिक्षेकऱ्यांना मदत करताना संसर्गाचा धोका संभवतो. या भिक्षेकऱ्यांचा सर्वत्र संचार राहत असल्यामुळे त्यांच्या लसीकरणासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज यानिमित्ताने पुढे येत आहे.

कोट.......

कोरोना महामारीत निराधार, भिक्षेकरी वर्ग दुर्लक्षित झालेला आहे. शासनाच्या जनगणनेनुसार प्रत्येक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. तुळजापूर शहरात अंदाजे ५० पेक्षा अधिक निराधार भीक मागणारे लोक आहेत. त्यांच्याकडे आधार कार्ड किंवा कसलेच ओळखपत्र नाही. त्यामुळे शासनाने त्यांना कशाच्या आधारे कोरोनाची लस देता येईल याचे नियोजन करावे.

- संजयकुमार बोंदर, एनसीआयबी क्राईम इन्फॉर्मशन ऑफिसर

बेवारस, भिक्षेकरी अशा नागरिकांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यापैकी कुठलेही एक दस्तऐवज असणे आवश्यक आहे. अन्यथा पोर्टलला नोंद होणार नाही. ज्यांच्याकडे कसलेच पुरावे नाहीत, त्यांच्या अनुषंगाने तहसीलदारांशी बोलणे झाले आहे. अशा लोकांची यादी काढून पालिकेकडे पाठवून त्यांचे रहिवासी प्रमाणपत्र काढल्यानंतर त्यांची आधार नोंदणी केली जाणार आहे. यानंतर त्यांनाही लसीकरण करता येईल.

- डॉ. चंचला बोडके, वैद्यकीय अधीक्षका

तुळजापूर शहरात भिक्षकरी अधिक

तुळजापूर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. यात बालकांपासून वृद्धापर्यंत सर्वच वयोगटातील भाविकांचा समावेश असतो. शिवाय, तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे दैनंदिन कामानिमित्त तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.

शहरात भाविकांची सतत वर्दळ असल्यामुळे तुळजापूरसोबतच इतर ठिकाणाहूनदेखील भिक्षेकरी शहरात भीक मागण्यासाठी येतात. विशेषत: बसस्थानक ते मंदिर या दरम्यानच्या रस्त्यावर अशा भिक्षेकऱ्यांची मोठी वर्दळ असते. लसीकरणासाठी शासनाच्या कोविन पोर्टलवर नोंदणी करावी लागते. त्यासाठी आधार क्रमांक लागतो. शिवाय, आधार नसेल तर पासपोर्ट, निवडणूक कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पेन्शन कागदपत्र असा कुठलाही पुरावा चालतो. परंतु, या भिक्षेकऱ्यांकडे असा कुठलाच पुरावा नसल्याने त्यांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: No Aadhaar card, how to vaccinate beggars?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.