अविश्वास ठराव रद्द, मानेंचे सरपंचपद कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:10 AM2021-09-02T05:10:53+5:302021-09-02T05:10:53+5:30
देवळाली ग्रामपंचायत येथे ९ सदस्य आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होऊन ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यानंतर १० फेब्रुवारी ...
देवळाली ग्रामपंचायत येथे ९ सदस्य आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होऊन ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यानंतर १० फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंच व उपसरपंच यांची निवड झाली. येथील सरपंचपद हे एससी प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे या प्रवर्गातील सचिन रमेश माने यांची सरपंचपदी व उपसरपंचपदी सागर सुनील खराडे यांची निवड झाली. दरम्यान, एका सदस्याने राजीनामा दिला असल्याने सध्या सदस्य संख्या ८ झाली आहे. दरम्यान, सरपंच माने यांनी विकास काम करताना किंवा कुठलाही ठराव घेताना इतर सदस्यांना विचारात घेत नसल्याचा दावा करीत त्यांच्या विरोधात २७ ऑगस्ट रोजी तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्याकडे उपसरपंच सागर सुनील खराडे व सदस्य आश्विनी नेमिनाथ तांबे, समाधान भारत सातव, कमल अशोक विधाते, तृप्ती युवराज तांबे, वनमाला सावता माळी या सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यानंतर भूमच्या तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांनी ग्रामपंचायत देवळाली यासाठी १ सप्टेंबर रोजी विषेश सभा बोलावली. परंतु, ५ मार्च २०२० च्या निवडणूक विभागाच्या परिपत्रकानुसार सरपंच व उपसरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीच्या दिनांकापासून दोन वर्षे कालावधीच्या आत व ग्रामपंचायतीची मुदत समाप्त होणाऱ्या दिनांकाच्या लगतच्या सहा महिन्यात असा कोणताही अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही, असे निर्देश असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही बैठक तहसीलदार उषाकिरण श्रृगांरे यांनी ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन मागवून रद्द केली. त्यामुळे सरपंच सचिन रमेश माने यांचे पद कायम राहिले आहे. यासंदर्भात विधिज्ञ शिवाजी पवार यांनी सरपंचांच्या बाजून युक्तिवाद केला होता.