तुळजाभवानी मंदिरात वेस्टर्न कपडे परिधान केलेल्यांना ‘नाे एन्ट्री’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 02:45 PM2023-05-18T14:45:34+5:302023-05-18T14:54:09+5:30
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकाेपर्यातून भाविक माेठ्या संख्येने येतात.
धाराशिव : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. आता याच देवीच्या मंदिरामध्ये ‘वेस्टर्न’ कपडे परिधान करून येणार्या भाविकांना ‘एन्ट्री’ बंद करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने मंदिर परिसरात संस्थानच्या वतीने परिसरात फलक लावण्यात आले आहेत.
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकाेपर्यातून भाविक माेठ्या संख्येने येतात. त्यामुळे केवळ यात्राेत्सव काळातच नव्हे तर एरवीही गर्दी असते. देवीच्या दर्शनासाठी येताना अंगावर काेणत्या स्वरूपाचे कपडे परिधान करायला हवेत, याबाबत कुठलेही नियम वा बंधने यापूर्वी नव्हती. मात्र, नुकतेच मंदिर संस्थानच्या वतीने काही बदल करण्यात आले आहेत. जे भाविक अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशाेभनिय (वेस्टर्न) तसेच हाफ पॅन्ट व बरमुडा परिधान करून येतील, त्यांना श्री तुळजाभावानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. निर्णयाची चाेख अंमलबजावणी व्हावी, यासाठी तातडीने मंदिर परिसरात याबाबतचे फलकही लावले आहेत. गुरूवारपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू झाली आहे.