रोहयोवरील मजुरांची आरोग्य तपासणीच नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:24 AM2021-05-31T04:24:01+5:302021-05-31T04:24:01+5:30
कळंब : तालुक्यातील ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामावर जवळपास दीड हजार मजुरांची उपस्थिती आहे. परंतु, कोरोना संसर्गाच्या ...
कळंब : तालुक्यातील ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामावर जवळपास दीड हजार मजुरांची उपस्थिती आहे. परंतु, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यातील एकाही मजुराची आरोग्य तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे.
कळंब तालुक्यात २२ मे रोजी पं.स. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार रोजगार हमी योजनेची एकूण १०८ कामे चालू होती. यामध्ये घरकुलाची ९, वैयक्तिक सिंचन विहिरीची ८८, सार्वजनिक विहिरीची ५, शेतरस्त्यांची ३ व वृक्षलागवडीच्या ३ कामांचा समावेश आहे.
या कामांवर १ हजार ४४७ मजुरांची नोंद होती. बहुतांश ठिकाणी अकुशल मजूर असल्याने त्यांना कोविडबाबत माहिती देणे गरजेचे होते. त्यासाठी शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा गावोगावी असणारे आशा कार्यकर्त्या यांच्यामार्फत प्रशासनाने मजुरांची ‘ऑन दी स्पॉट’ तपासणी करणे आवश्यक होते. परंतु, तालुकाभरात एकाही कामावर अशी तपासणी झाली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
घरकुलाची कामे वगळता सिंचन विहीर, रस्ते या कामावर ५ किंवा त्यापेक्षा जास्त मजूर कामावर उपस्थित असल्याचे कागदावर दिसत आहेत. ते सर्व मजूर प्रत्यक्षात कामावर असतील तर तेथे साहित्याची देवाण घेवाण, जेवण आदीप्रसंगी एकमेकांचा संपर्क आलाच असेल. त्यामुळे कोरोनाच्या समूह संसर्गाचीही तेथे शक्यता असताना पं.स. प्रशासनाने जवळपास दीड हजार मजुरांच्या आरोग्याकडे डोळेझाक केली की मजुरांच्या उपस्थितीविषयी सत्यपरिस्थिती समोर येऊ नये म्हणून आरोग्य तपासणीची प्रक्रिया केली नाही, अशी चर्चाही पं.स. वर्तुळात चालू आहे.
चौकट -
सर्व कामांवर मजूर हजर
पंचायत समितीमार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात चालू असलेल्या सर्व कामांवर मजूर उपस्थित आहेत. या कामांवर कोविडचे निर्देश पाळून कामे केली जात असल्याची माहिती कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नामदेव राजगुरू यांनी दिली.
प्रशासनाचे निर्देश नाहीत
रोजगार हमी योजनेवरील कामावर उपस्थित असणाऱ्या मजुरांची तपासणी करण्याबाबत तालुका प्रशासनाने आरोग्य विभागाला कोणत्याही सूचना किंवा निर्देश दिले नाहीत. त्याबाबत आमच्याशी संपर्क केला असता तर त्या मजुरांची आम्ही तपासणी केली असती.
डॉ. प्रदीप जाधव, तालुका आरोग्य अधिकारी
मजुरांची संख्या घटली?
कोरोनाचा संसर्ग जास्त असताना तालुक्यात रोहयो कामावर मजुरांची संख्या जास्त होती. २२ मे रोजी प्रशासनाने दीड हजार मजूर कामावर असल्याचे सांगितले होते. तर यानंतर २६ मे रोजी तीच संख्या घसरून ३०० च्या घरात आल्याचे रोहयो कामांची माहिती घेतल्यानंतर समोर आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर अचानक मजूर संख्या कमी कशी झाली? की कोरोनामध्ये प्रशासकीय यंत्रणा गुंतली असल्याने रोहयो लॉबीने कागदोपत्री मजूर दाखवून मस्टर भरले? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
चौकट -
केवळ कागदावर कामे?
तालुक्यातील कोथळा, एकुरका व देवधानोरा या गावात रोहयो अंतर्गत रस्त्याची कामे चालू असल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. याबाबत कोथळा येथील माजी सरपंच दिगंबर ठोंबरे यांच्याकडे माहिती घेतली असता प्रत्यक्ष कामावर मजूर आहेत असे एकही काम मागील सहा महिन्यात तरी गावाच्या परिसरात आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
एकुरका येथील शेतकरी अमोल घोगरे यांनीही त्यांच्या एकुरका गावात किंवा परिसरात मजुरांच्या साह्याने रस्त्याचे एकही काम मागील वर्षभरात झाले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही कामे कागदावर चालू असल्याचा संशय बळावतो आहे.
चौकट -
सर्वच कामे संशयास्पद
पंचायत समितीअंतर्गत चालू असलेली रोहयोची सर्व कामे संशयास्पद आहेत. प्रशासन येथे कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून एकेका नागरिकांची चाचणी करीत आहे. तिथे दीड हजार मजुरांची तपासणीच झाली नाही, हे धक्कादायक आहे. काही पदाधिकारी, अधिकारी संगनमत करून ही कामे कागदावर करून पैसे उचलत असावेत, अशी शंका आहे. या कामांची त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करून संबंधित अधिकारी, तांत्रिक अधिकारी व कामे न करता पैसे उचलणाऱ्या मजुरांवरही कार्यवाही करावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सतपाल बनसोडे यांनी सांगितले.