कोणीही मरायचं नाय, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ: मनाेज जरांगे
By बाबुराव चव्हाण | Published: October 5, 2023 02:42 PM2023-10-05T14:42:39+5:302023-10-05T14:44:35+5:30
संयम साेडू नका, उग्र आंदाेलन तर मुळीच नको, मनोज जरांगे यांचे आवाहन
धाराशिव : मराठा समाजाच्या पाेरांना शिक्षण आणि नाेकरीत आरक्षण मिळावं, म्हणून हा लढा सुरू केला आहे. आणि आपणच जर आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलून जीवन संपविणार असाल तर हे आरक्षण काेणासाठी मिळवायचं? त्यामुळं यापुढं काेणीही मरायचं नाही अन् संयमही साेडायचा नाही. उग्र आंदाेलन तर मुळीच नकाे. शांततेच्या मार्गाने सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, असा शब्द मनाेज जरांगे पाटील यांनी दिला.
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात संवाद यात्रेदरम्यान गुरूवारी झालेल्या सभेत ते बाेलत हाेते. जरांगे पाटील म्हणाले, आपण सरकारला ४ दिवसांची मुदत दिली हाेती. चार दिवसांतही आरक्षण देता येतं. मात्र, सरकारने आपणाकडून वेळ मागितला. ३० दिवसांचा वेळ द्या, टिकणारं आरक्षण देऊ, असं त्यांनी शब्द दिला. टिकणारं आरक्षण देणार असाल तर आणखी दहा दिवस घ्या, म्हणून आपण सरकारला चाळीस दिवस दिले. ही मुदत जवळ आली आहे. आता समितीतले लाेक राेज विमानं घेऊन हैदराबा, मुंबई, छत्रपती संभाजीनगरला पळताहेत. माघारी येऊन काहीच सापडलं नाही, असं म्हणताहेत.
तिथं माेडी, फारशी भाषेत लिहिलेलं आहे. या पठ्ठ्यांना या भाषाच येत नसेल तर नाेंद कशी सापडेल. यानंतर आम्ही संशाेधकांना साेबत घेण्याचा मुद्दा मांडल्यानंतर लगेच ५ हजार नाेंदी सापडल्याचं सांगण्यात आलं. आता लगेच कशा सापडल्या नाेंदी? सरकारचं म्हणणं हाेतं, कायदा पारित करण्यासाठी आधार लागताे. आता मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, असा ५ हजार पानांचा भलामाेठा आधार मिळाला आहे. या सरकारला आणखी किती माेठा आधार हवा आहे? आरक्षणासाठी काय ट्रभर आधार लागताे का, असा सवाल करीत या नाेंदीच्या आधारेच टिकणारं आरक्षण देता येतं, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
कुणी काही म्हटलं तरी आपल्यात फुट पडू द्यायची नाही. आणि काेणी मरायचंही नाही. आत्महत्येसारखं टाेकाचं आपण पाऊल उचलणार असू तर हे आरक्षण मिळवायचं काेणासाठी? साेबतच कुठल्याही परिस्थितीत तसूभरही संयम ढळू द्यायचा नाही. उग्र स्वरूपाचे आंदाेलन तर मुळीच नकाे. अशा आंदाेलनामुळं आपण सुरू केलेला हा संघर्ष, लढा, आंदाेलन बदनाम हाेईल. साेबतच आपल्या पाेरांवर कसेस पडतील. त्यांना पुढं शिक्षण आणि नाेकरीवेळी अडचण येईल. त्यामुळं या मार्गानं काेणीही जायचं नाही. शांततेच्या मार्गानंच सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, असा ठाम विश्वासही त्यांनी उपस्थित जनसमुदायास दिला. यावेळी चाैकात फाय ठेवायलाही जागा नव्हती.