'पदाचं तारतम्यच राहिलं नाही,तेव्हा कुठे नादाला लागायचे';शरद पवारांची राज्यपालांवर सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 04:34 PM2022-03-07T16:34:44+5:302022-03-07T17:46:59+5:30
मध्यंतरी काही जण पक्ष सोडून गेले. ठीक आहे, त्यांची चिंता नाही.
उस्मानाबाद : राज्यपालांनी काही भाषणे केली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही विधाने केली. जेव्हा पद व अधिकार याचे तारतम्यच राहिले नाही तर कुठे नादाला लागायचे, आशा शब्दांत खा. शरद पवार ( Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhgatsingh Koshiyari) यांचा रविवारी पाडोळीत समाचार घेतला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी येथे विकास कामांच्या उदघाटनासाठी रविवारी ते येथे आले होते. मंचावर आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, आपले राज्य हे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती-धर्माची लोकं सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्यांनी कधी भोसलेशाही होऊ दिली नाही. नाहीतरी आपल्या देशात मुघल, आदिलशाही, कुतुबशाही अशा राजवटी होऊन गेल्या. हाच विचार घेऊन राज्याची वाटचाल सुरू आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. काही पदाधिकाऱ्यांनी हा विषय समोर आणल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना फोन करून आढावा घेतला व हे विषय लवकर सोडविण्यासाठी आग्रह केला. यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असा शब्द पवार यांनी यावेळी दिला.
जे गेले ते गेले, चिंता नाही...
पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेले डॉ. पद्मसिंह पाटील व आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा नामोल्लेख न करता पवार म्हणाले, या जिल्ह्याने आम्हाला इतकी वर्षे भरभरून प्रेम दिले. मध्यंतरी काही जण पक्ष सोडून गेले. ठीक आहे, त्यांची चिंता नाही. तुम्ही सर्वजण सोबत असताना कशाला चिंता करायची, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली.
कोण म्हणतं मी म्हातारा...
मघाशी काही जण बोलताना माझ्या वयाचा उल्लेख सातत्याने करत होते. मागेही मी म्हटले होते की तुम्हाला काय माहीत मी थकलोय म्हणून. जोपर्यंत या समाजाची साथ आहे, तोपर्यंत थकणार नाही आणि थांबणारही नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.