नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:30+5:302021-07-14T04:37:30+5:30
उस्मानाबाद : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद झाली. यात शेती पिकासोबतच ...
उस्मानाबाद : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद झाली. यात शेती पिकासोबतच रस्ते, पूल आदींचेही मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला दिले असल्याची माहिती खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.
तुळजापूर तालुक्यातील सलगरा, इटकळ, जळकोट, मंगरुळ, परंडा तालुक्यातील आसू, जवळा, आनाळा, सोनारी, उमरगा तालुक्यातील उमरगा, दाळिंब, गुळज, तसेच लोहारा तालुक्यातील लोहारा, माकणी व उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यानंतर दुसऱ्या दिवशी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत मेंढा, लासोना, सांगवी, बोरखेडा, कनगरा, बोरगाव (राजे), घुगी, पाडोळी, कामेगाव तसेच समुद्रवाणी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे ओढे, नाल्यांना पूर आला होता. या पुरामध्ये लासोना येथील बबन भगवान रसाळ (वय ४२) व कनगरा येथील समीर गुनुस शेख (वय २७) हे दोघेजण वाहून गेले होते. पावसाचे पाणी गावात शिरल्याने अनेक घरांची पडझड झाली. नुकतीच पेरणी केलेली पिके, जमिनी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्या. तसेच रस्त्यावरील जुने पूल व बंधारे वाहून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे या पाहणीवेळी दिसून आल्याचे खा. राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे, पीक नुकसानीचे, घरांच्या पडझडीचे तसेच जीवित हानीचे पंचनामे तत्काळ करणे. वाहून गेलेले पूल व बंधारे याची दुरुस्ती, मयतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी खा. राजेनिंबाळकर यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे, घरांचे, पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत. काही अडचण आल्यास खासदार संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन राजेनिंबाळकर यांनी केले आहे.