माहिती मागणाऱ्यास गुन्हा नोंदविण्याची नोटीस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:37 AM2021-09-12T04:37:22+5:302021-09-12T04:37:22+5:30
तेर : माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी चक्क ‘पुन्हा माहिती मागितल्यास फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल’, अशी ...
तेर : माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी चक्क ‘पुन्हा माहिती मागितल्यास फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल’, अशी नोटीस पाठविल्याची तक्रार येथील राजाभाऊ आंधळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. येथील राजाभाऊ भगवान आंधळे यांनी तेर येथील पेठ विभागातील जागेच्या मालकी हक्काचा उतारा मिळण्याबाबत भूमि अभिलेख कार्यालयाकडे विनंती अर्ज केले होते. परंतु, तो मिळत नसल्याने अखेर त्यांनी माहिती आधिकार कायद्यानुसार या उताऱ्याची मागणी केली. यावेळी जागेच्या मालकी हक्काचा उतारा उपलब्ध नसल्याचे आंधळे यांना सांगण्यात आल्याने त्यांनी उतारा नसेल तर तसे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. परंतु, त्यांना माहीती न देता उलट पुन्हा माहिती आधिकारात माहिती मागितली तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी नोटीस जनमाहिती आधिकारी यांनी दिली. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून आपणास न्याय मिळवून द्यावा, असे निवेदन आंधळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.