आता कानांना ऑटोमायकोसिसचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:30+5:302021-06-25T04:23:30+5:30
उस्मानाबाद : पावसात भिजल्याने कानात पाणी जात असते. त्यामुळे कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण ...
उस्मानाबाद : पावसात भिजल्याने कानात पाणी जात असते. त्यामुळे कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ५ ते ७ रुग्ण ऑटोमायकोसिसच्या समस्येने त्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ऑटोमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. या आजारात मुख्यतः कानाला संसर्गाचा धोका अधिक असतो. बुरशीजन्य कानात होणारे संक्रमण मुख्यत: कान कालवावर परिणाम करते. दूषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे आणि मधुमेह या कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. मात्र, अद्यापही कानदुखीसारख्या रोगांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने दुर्लक्षामुळे हा धोका अधिक वाढण्याची भीती आहे. कानात पाणी शिरणे अथवा वेळेत ते काढले न जाणे, कानात तेल टाकणे, जुने ड्राप टाकणे, एअर फोनचा सतत वापर करणे, यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. जिल्हा रुग्णालयात प्रतिदिन ५ ते ७ रुग्ण ऑटोमायकोसिस आजाराचे येत असल्याचे डॉक्टर म्हणाले. ऑटोमायकोसिसमुळे आवाज कमी येणे, पू येणे, कान दुखणे, कान भरल्यासारखे वाटणे अशी लक्षणे असून, वेळीस उपचार न घेतल्यास बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते. असे कान-नाक-घसा तज्ज्ञांनी सांगितले.
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
१.ऑटोमायकोसिसचे रुग्ण वर्षभर आढळून येत असतात. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात त्याचे प्रमाण अधिक असते. पावसात भिजल्याने पाणी कानात जाते, कान वेळेवर कोरडे न केल्याने कानात पाणी साचून राहते. त्यामुळे कान दुखण्याची समस्या उद्भवते.
२. कानातील मळ काढण्यासाठी अनेकजण कानात तेल टाकत असतात. शिवाय कापसाच्या काडीने कान साफ केले जातात, तर काहीजण जुने कुठलेही ड्राप्स कानात टाकत असतात. एअरफोनचा सतत वापर यामुळे ऑटोमायकोसिसचा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टर म्हणाले.
काय घ्याल काळजी
ऑटोमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी कान कोरडे ठेवणे.
अंघोळीचे पाणी, तसेच पावसाचे पाणी कानात गेल्यानंतर कानाला हात न लावता मान वाकडी करून पाणी बाहेर येऊ द्यावे.
कापसाच्या काड्या कानात घालणे टाळावे, तसेच मळ काढण्यासाठी कानात तेल टाकणे टाळावे. एअरफोनचा वापर कमी करावा. जुने ड्राप्स कानात टाकू नये, टोकदार वस्तूने कान स्वच्छ करणे टाळावे. कानाचा त्रास उद्भवू लागल्यास घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
कोट...
कानातील मळ काढण्यासाठी कानात तेल टाकणे धोक्याचे ठरू शकते. शिवाय, ड्राप्स फोडल्यानंतर तो ड्राप्स एका महिन्याच्या कालावधीपर्यंत वापरता येतो. मात्र, नागरिक कानात दुखत असल्यास कुठलाही ड्राप्स कानात सोडत असतात. त्यामुळे कानाचे त्रास उद्भवतात. कानाचा त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
डॉ. सचिन देशमुख,
कान-नाक-घसा तज्ज्ञ
पावसात भिजल्यानंतर कानात पाणी गेल्यानंतर तत्काळ कान कोरडे करणे गरजेचे असते. काहीजण कान धुऊन घेण्यावर भर देतात. मात्र, कान धुतल्यानंतर ते स्वच्छ नाही केले तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. कान दुखू लागल्यास किंवा कानातून पाणी येऊ लागल्यास त्वरित उपचार घ्यावे. तत्काळ उपचार न घेतल्यास बहिरेपणा येऊ शकतो.
डॉ. रवींद्र पापडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ