शालेय विद्यार्थ्यांच्या आहारात आता फाेर्टिफाइड तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:18+5:302021-07-23T04:20:18+5:30
तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : कुपाेषण कमी करण्यासाठी साधारणपणे २०१८ मध्ये शासनाने विद्यार्थ्यांना फाेर्टिफाइड तांदूळ पाेषण आहारात देण्याची याेजना आखली ...
तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : कुपाेषण कमी करण्यासाठी साधारणपणे २०१८ मध्ये शासनाने विद्यार्थ्यांना फाेर्टिफाइड तांदूळ पाेषण आहारात देण्याची याेजना आखली हाेती. या याेजनेची सध्या अंमलबजावणी सुरू झाली आहे. हा तांदूळ भरपूर पाेषक तत्त्वे असणारा आहे; परंतु, स्थानिक यंत्रणेकडून जनजागृती करण्याकडे डाेळेझाक करण्यात आली. त्यामुळे हा प्लास्टिकयुक्त तांदूळ असल्याची अफवा पसरली आहे. काही पालक हा तांदूळ आहार देणे टाळू लागले आहेत.
पूर्वीच्या तुलनेत कुपाेषित बालकांचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्णत: दूर झालेले नाही. मागास जिल्ह्यांत हा प्रश्न अधिक गंभीर आहे. हीच बाब लक्षात घेऊन भरपूर पाेषक तत्त्वे असलेला तांदूळ विद्यार्थ्यांच्या पाेषण आहारात देण्याचा निर्णय घेतला हाेता. प्रायाेगिक तत्त्वावर ओरिसा राज्यात फाेर्टिफाइड तांदळाचा पुरवठा करण्यात आला हाेता. हा प्रयाेग यशस्वी झाल्यानंतर साधारणपणे २०१८ मध्ये राज्यातील गडचिराेली जिल्ह्यात हा प्रयाेग हाती घेतला हाेता. दरम्यान, येथील प्रयाेग फायदेशीर ठरल्यानंतर आता राज्यातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांंच्या पाेषण आहारात हा तांदूळ पुरवठा करण्यात येऊ लागला आहे. फाेर्टिफाइड तांदूळ हा सामान्य तांदळाचे पीठ तयार करून त्यात व्हिटॅमिन डी, बी, लाेह आणि फाॅलिक ॲसिड, आदी महत्त्वाचे घटक मिसळले जातात. हा तांदूळ सामान्य तांदळात एक टक्का (१०० किलाे सामान्य तांदळात एक किलाे) मिसळून पुरवठा केला जाताे. असे असतानाच दुसरीकडे, विशेषत: ग्रामीण भागात फाेर्टिफाइड तांदूळ हा प्लास्टिकयुक्त असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे अनेक पालक भरपूर पाेषक तत्त्वे असलेला हा तांदूळ पाल्यांना आहारात देण्यास नकार देत आहेत. एवढेच नाही तर प्रशासनाच्या दरबारी तक्रारीही धडकू लागल्या आहेत. उपराेक्त प्रकार लक्षात घेता, शिक्षण विभागाने जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे.
चाैकट...
काय आहेत फायदे?
फाेर्टिफाइड तांदळामध्ये लाेहघटक व इतर पाेषक तत्त्वे असल्याने ते कुपाेषित, रक्तक्षयग्रस्त व सिकलसेल रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे. सामान्य तांदळाचे पीठ तयार करून पुन्हा त्यापासून तांदूळ तयार केला जाताे. त्यामुळे सामान्य तांदळापेक्षा याचा आकार थाेडा माेठा असताे. हे तांदूळ लवकर शिजतात आणि शिजल्यानंतर आकाराने आणखी माेठे हाेतात. सामान्य तांदळापेक्षा त्याची चवही थाेडी वेगळी राहते.
काटगाव शाळेला भेट
तांदूळ प्लास्टिकयुक्त असल्याची तक्रार १७ राेजी काटगाव येथील ग्रामस्थांनी तुळजापूर गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे केली हाेती. शंकेचे निरसन करण्यासाठी मंगरूळ बिटचे विस्तार अधिकारी मल्हारी माने, केंद्रप्रमुख वाले, शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष महाजन, ग्रामसेवक भीमराव झाडे, उपसरपंच अशोक माळी, मुख्याध्यापक बी. आर. सपकाळ यांनी शाळेत जाऊन तांदळाची शहानिशा केली. तांदूळ शिजवून त्याची चव तपासली. यानंतर पालकांनाही माहिती दिली. सदरील तांदूळ फाेर्टिफाइड असल्याचे त्यांनी सांगितले.