कोरोनाची रुग्णसंख्या वाढली, मात्र सॅनिटायझरचा वापर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:33 AM2021-03-17T04:33:05+5:302021-03-17T04:33:05+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच सॅनिटायझरचा वापर कमी झाला आहे. औषध विक्रत्यांकडे आढावा घेतला असता ...
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच सॅनिटायझरचा वापर कमी झाला आहे. औषध विक्रत्यांकडे आढावा घेतला असता विक्रत्यांनी सॅनिटायझरच्या वापरात ७० टक्के घट झाल्याचे सांगितले.
गतवर्षी मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले होते. कोविडच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून लॉकडाऊन जारी केला होता. वाढत्या संसर्गामुळे अनेक नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर वापरावर भर दिला होता. त्यामुळे मास्क व सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. परिणामी, अनेक दुकानात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला होता. उत्पादन शुल्क विभागाने काराखान्यांना ५ सॅनिटायझर निर्मिती करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातच सॅनिटायझर उत्पादन होऊ लागले. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्ण संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून अनेकांनी मास्क व सॅनिटायझर वापराकडे पाठ फिरविल्याचे पाहवयास मिळत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. असे असतानाही नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वापराचा विसर पडल्याचे दिसून येते. सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयात सॅनिटायझर स्टॅड उभारण्यात आलेले आहेत. गतवर्षी दोन-तीन दिवसात दोन लिटर सॅनिटायझर संपायचे मात्र, आता त्या स्टँडला कोणी हात लावत नसून सॅनिटायझरची बाटली भरलेलीच दिसते. जिल्ह्यात सद्यस्थितीत सॅनिटायझरला ७५ टक्क्यांनी मागणी घटली आहे. तर मास्कच्या विक्रीतही ५० टक्क्यांनी घट झाल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.
मागील वर्षीची विक्री
९० टक्केे
यावर्षीची सॅनिटायझरची विक्री
३०
मास्क विक्रीत ४५ टक्क्यांनी
झाली घट
७० टक्के विक्री घटली
जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले. पण मार्च महिन्यापासून नागरिक मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यावर भर दिला होता. त्यामुळे सॅनिटायझरला मागणी मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे गवतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात सॅनिटायझरचा तुटवडा झाला होता.
प्रत्येक नागरिक खिशात सॅनिटायझरची बाटली ठेवत असल्याने दिवसाकाठी ३० ते ४० ग्राहक सॅनिटायझर प्रत्येक औषधी दुकानातून खरेदी करीत होते.
एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात ९० टक्के सॅनिटायझरची विक्री होत होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून रुग्ण कमी होऊ लागल्याने सॅनिटायझरच्या विक्रीत घट झाली. मार्च महिन्यांपासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, नागरिकांतून सॅनिटायझरला मागणी नसल्याचे औषध दुकानदारांनी सांगितले.
कोट...
गतवर्षी मार्च महिन्यापासून मास्क व सॅनिटायझरला मागणी होती. प्रत्येकी व्यक्ती मास्क व सॅनिटायझर खरेदी करीत. मागील तीन महिन्यापासून मास्कची विक्री ५० टक्क्यांनी घटली आहे. तर सॅनिटायझरची विक्री ७० टक्क्यांनी घटली आहे.
-धनाजी आनंदे, अध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन
प्रतिक्रिया...
साबणाने हात धुण्यावर भर
कोरोना संसर्गाच्या काळात स्वच्छतेबाबत खबरदारी घेतली जात आहे. मास्कच्या वापराबरोबर नियमित साबणाने हात धुण्यावर भर दिला जात आहे. शिवाय, शासकीय कार्यालयात सॅनिटायझर उपलब्ध असते. त्यामुळे सोबत सॅनिटायझर बाळगत नाही.
समाधान सरवदे, नागरिक
दिवाळीपासून रुग्णांची संख्या कमी झाली होती. मागील दहा पंधरा दिवसापासून रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर वापरत आहे. शिवाय, गर्दीत जाळे टाळत आहे.
किशोर कांबळे, नागरिक