कोरोनाबाधितांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:37 AM2021-09-12T04:37:53+5:302021-09-12T04:37:53+5:30
उस्मानाबाद : गेल्या आठवडाभरात एक अपवाद वगळता चाळिशीत आलेला कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी पुन्हा उंचावला आहे. विशेष म्हणजे, पॉझिटिव्हिटी रेट ...
उस्मानाबाद : गेल्या आठवडाभरात एक अपवाद वगळता चाळिशीत आलेला कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी पुन्हा उंचावला आहे. विशेष म्हणजे, पॉझिटिव्हिटी रेट हा जवळपास ६ टक्क्यांवर राहिला. ही जास्त चिंतेची बाब आहे. शनिवारी अहवाल प्राप्त झालेल्या ९६७ नमुन्यांपैकी ५६ जणांचे नमुने बाधित आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या चांगलीच घटली होती. तरीही दैनंदिन सरासरी ५० प्रमाणे रुग्ण आढळून येत होते. गेल्या आठवडाभरात ही संख्याही कमी होऊन सरासरी चाळिशीतच आली. असे असतानाच शनिवारी ५६ रुग्ण आढळून आले आहेत. ९५५ जणांची चाचणी ही रॅपिड अँटिजेन किटने करण्यात आली होती. त्यातील ४४ नमुने कोरोनाबाधित आढळले, तर प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या १२ पैकी १२ नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी प्राप्त अहवालानुसार एकूण चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे ५.७९ टक्के इतके आहे. हा पॉझिटिव्हिटी रेट जितका वाढेल तितकीच जिल्ह्याची चिंता वाढणारी आहे. दरम्यान, आजतागायत जिल्ह्यात ६६ हजार १९७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ६३ हजार ६५३ रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत, तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३८ इतकी आहे.
असे आढळून आले बाधित रुग्ण...
गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात एकूण २३४ रुग्ण आढळून आले आहेत. मागील रविवारी ३०, सोमवारी ५४, मंगळवारी ३७, बुधवारी ४१, गुरुवारी ३६ व शुक्रवारी ३६ कोरोनाबाधित आढळले होते. शनिवारी हीच संख्या ५६ वर गेली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सर्वत्र वर्दळ दिसू लागली आहे. अशावेळी मास्कचा वापर व सुरक्षित अंतर राखून स्वत:चा व इतरांचाही बचाव करणे आवश्यक आहे.