दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्याचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:27 AM2021-01-09T04:27:03+5:302021-01-09T04:27:03+5:30
उस्मानाबाद : दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहतूक नियम न पाळणाऱ्या दुचाकीचालकांकडून अनेक अपघात घडत ...
उस्मानाबाद : दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहतूक नियम न पाळणाऱ्या दुचाकीचालकांकडून अनेक अपघात घडत आहेत. स्वत:सह दुसऱ्यांचा जिव धोक्यात घालून हे वाहनधारक सुसाट वाहने चालवत आहेत. त्यांना ना अपघाताची भीती वाटते, ना पोलिसांच्या कारवाईची, असे चित्र दिसून येते.
दुचाकी चालविताना आपला जीव धोक्यात टाकून दुसऱ्यांचेही जीवन उध्वस्त करणारे लोक वाहन चाहन चालविताना मोबाईलवर सर्रास बोलताना दिसतात. अशा बेशिस्त चालकांवर पोलिस विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. २०१९ मध्ये अशा ५९१ वाहनचालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून १ लाख १८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. २०२० मध्ये ७६७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारुन १ लाख ५२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. असे असले तरी अनेक वाहनचालक दुचाकी चालविताना दंडाची किंवा अपघाताची तमा न बाळगता बिनधास्त मोबाईलवर बोलताना आढळून येतात. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चाैक, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक, राजमाता जिजाऊ चाैक, नेहरु चाैक, आठवडी बाजार वर्दळीच्या ठिकाणी वाहनचालक मोबाईलवर बोलताना सर्रास नजरेस पडतात. ज्या ठिकाणी वाहतूक पोलीस नाहीत, अशा ठिकाणी निष्काळजीपणा अधिक दिसून येतो. त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे आता अशा वाहनधारकांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकट
दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवर २०० रुपये दंड आकारण्यात येतो. हाच गुन्हा पुन्हा केल्यास दंडाच्या रक्कम वाढते. परंतु, सातत्याने कारवाई करण्यात येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार पोलीस ठाण्याच्या परिसरातून दुचाकीवरुन मोबाईलवर बोलताना आढळून येतात.
कोट...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांना २०० रुपयांचा दंड केला जात आहे. २०१९ मध्ये ५९१ तर २०२० या वर्षात ७६३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांविरुध्द यापुढेही कारवाया सुरुच ठेवण्यात येणार आहेत.
इक्बाल सय्यद
पोलीस निरीक्षक