लोहाऱ्यात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:46 PM2018-11-13T17:46:43+5:302018-11-13T17:47:14+5:30
रामकृष्ण घायाळ हे मागील अनेक वर्षापासून कोणतीही पदवी नसताना अनाधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करत होते़.
लोहारा (उस्मानाबाद ) : मागील अनेक वर्षापासून अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या शहरातील बोगस डॉक्टरविरूध्द आरोग्य, महसूल विभागाने कारवाई केली. ही कारवाई आज करण्यात आली असून, या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लोहारा शहरातील शिवाजी चौकातील कानेगाव रस्त्यालगत असलेल्या एका दुकानात रामकृष्ण घायाळ हे मागील अनेक वर्षापासून कोणतीही पदवी नसताना अनाधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करत होते़ प्रारंभी योग निसर्गोपचार करत असल्याचे सांगितले जात होते. परंतु नंतर मात्र कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अॅलोपॅथिक उपचार करून रूग्णांच्या जिवनाशी खेळत असल्याची माहिती समोर आली.
या संदर्भात आरोग्य विभागाकडे तक्रारी वाढल्याने अखेर लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आर.यू. सूर्यवंशी व महसूल विभागाचे नायब तहसीलदार आर.आर. शिराळकर, पेशकार बालाजी चामे आदींच्या पथकाने मंगळवारी सकाळी दवाखान्यावर कारवाई केली़ बोगस डॉक्टर रामकृष्ण घायाळ यांना रुग्णावर उपचार करताना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणी डॉ.आर.यू. सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर घायाळ विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी घायाळ यांना अटक केली आहे़