वृद्धेने शेतात राहून केली काेराेवर मात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:32 AM2021-05-26T04:32:18+5:302021-05-26T04:32:18+5:30
कळंब - ऑक्सिजन ९३ ची पातळी सोडेना. एचआरसीटीमध्ये ४० पैकी २१ चा स्कोर दाखविला. दम लागण्याबरोबरच इतरही कोरोनाची लक्षणे ...
कळंब - ऑक्सिजन ९३ ची पातळी सोडेना. एचआरसीटीमध्ये ४० पैकी २१ चा स्कोर दाखविला. दम लागण्याबरोबरच इतरही कोरोनाची लक्षणे होती. परंतु, शासकीय व खासगी दवाखान्यात बेड शिल्लक नाही म्हणून दारातच थांबविलेले. पण संकटाशी दोन हात करण्याची जिगर असलेल्या त्या मातेने शेतात राहून कोरोनाला चितपट केले.
कळंब तालुक्यातील हासेगाव (केज ) येथील बालिका ज्ञानेश्वर यादव या ६५ वर्षीय वृद्धेने प्रबळ व खंबीर मानसिकतेच्या जोरावर कोरोनासारख्या आजाराला ही परतावून लावले अन् अनेकांना ‘लढा आणि जिंका’चा मंत्र दिला.
महिनाभरापूर्वी बालिका यादव यांना ताप, अंगदुखी, सर्दी व दम लागने असा त्रास सुरु झाला. भारतीय सैन्यदलात कर्तव्यावर असलेले त्यांचे सुपुत्र रामहरी यादव हे सुटीवर असल्याने हासेगाव येथे होते. त्यांनी ही कोरोनाची लक्षणे आहेत हे लक्षात येताच शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी केली. त्यामध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, त्यामुळे त्यांनी उस्मानाबाद येथे जाऊन एचआरसीटी केली .त्यात ४० पैकी २१ स्कोर आला. त्यानंतर दवाखान्यामध्ये भरती करण्यासाठी धावपळ सुरु झाली. त्यांना कुठे बेड उपलब्ध झाला नाही व स्कोर जास्त असल्यामुळे त्यांना कुठल्याही हॉस्पिटलला भरती करून घेण्यात आले नाही. काही ठिकाणी तर तेथील डॉक्टरांनी बाहेर येऊन त्यांच्या आईला पाहिले ही नसल्याचा अनुभव आला.
या परिस्थितीत काय करावे ते कळत नव्हते. शेवटी त्यांनी कळंब येथील डॉ. शाम चौधरी यांची भेट घेतली. त्यांच्या हॉस्पिटल मध्येही बेड शिल्लक नव्हता, परंतु त्यांनी औषध दिली.
परिस्थिती काय आहे हे रामहरी यादव यांच्या लक्षात आले. त्यांनी आईला आधार देताना हा आजार छोटा आहे,डॉक्टरांनी औषधे दिली आहेत व शेतात राहायला सांगितले आहे. यातून लवकर नीट होशील असा आशावाद व्यक्त केला. बालिका यादव यांनीही सकारात्मक विचार केला व या आजाराला शेतात राहूनच पळवून लाऊ, असा शब्द दिला.
यानंतर बालिका यादव यांचा कोरोनाशी लढा शेतात राहून सुरु झाला. दररोज सकाळी योगासन, अनुलोम विलोम ,कपालभाती ,कोमट पाणी पिणे ,योग्य आहार आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेच्या वेळेवर घेणे असा दिनक्रम ठेवला. याबरोबरच दररोज सकारात्मक विचार, मन आनंदी ठेवणे व दररोज लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेतल्याने चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळाली असेही त्यांनी सांगितले. यामुळे दहा दिवसातच तब्येत पूर्वपदावर आली .मुलाने दिलेला मानसिक आधार कोरोनाविषयी असलेली मोठी भीती मनात न ठेवल्याने तसेच निसर्गाच्या सानिध्यात उपचार घेतल्याने कोरोनावर मात करू शकले, असेही बालिका यादव यांनी नमूद केले.
चौकट -
तब्येत उत्तम, ऑक्सिजन पातळी ही चांगली -रामहरी यादव
सध्या आईची तब्येत चांगली आहे. ऑक्सिजन पातळी ही ९५-९६ पर्यंत आली आहे. आजारपणाचा काळात आम्ही शेतात राहून उपचार केले. त्याचाही चांगला फायदा झाला. सर्वसाधारण आजारासारखाच कोरोना आहे हे समजून त्याला सामोरे गेलाे. मनात भीती नाही बाळगली, सकारात्मक विचार ठेवले व योग्य औषधोपचार घेतला तर नक्कीच कोरोनावर घरी किंवा शेतात राहूनही उपचार घेऊ शकतो, अशी माहिती रामहरी यादव यांनी दिली.