'ओमराजे की राणादादा'... शर्यत लावणाऱ्या 'त्या' कार्यकर्त्यांना अटक, जुगाराचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 07:56 PM2019-04-30T19:56:16+5:302019-04-30T19:57:37+5:30
ग्रामीण भागात निवडणुकीचा माहोल काही औरच असतो. कार्यकर्ते आपलाचा नेता विजयी होईल अशा थाटात बोलत असतात.
उस्मानाबाद - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ओमराजे की राणादादा असे म्हणत पैज लावणाऱ्या चारही कार्यकर्त्यांविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करुन जिल्ह्यातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पैज लावली होती. मात्र, याबाबत वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा नोंद केला आहे.
जिल्ह्यातील 1) बाजीराव विष्णु करवर रा.राघुचीवाडी ता.जि.उस्मानाबाद 2) शंकर विठ्ठल मोरे रा.राघुचीवाडी 3) हनुमंत पाराप्पा ननवरे रा.वाघोली ता.जि.उस्मानाबाद 4) जिवन अमृतराव शिंदे रा.घाटंग्री ता.जि.उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद कोर्टाचे बाजुस शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लोकसभा सार्वत्रिक निवडणुक उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातुन कोण निवडुन येईल, याबाबत पैज लावली होती. कायद्यानुसार हे बेकायदेशीर असून एकमेकांच्या किमती वस्तुचे आमिष दाखवून मोटार सायकल क्र. एम.एच. 24 सी. 8811, टाटा इंडिगो चारचाकी गाडी क्र. एम.एच. 25 पी. 0010 यावर आरोपितांनी पैज लावून जुगार खेळला आहे. म्हणुन वरिल आरोपीविरुध्द दिनांक 29.04.2019 रोजी आनंदनगर पोलीस स्टेशन येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन आनंदनगर यांनी केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात निवडणुकीचा माहोल काही औरच असतो. कार्यकर्ते आपलाचा नेता विजयी होईल अशा थाटात बोलत असतात. अनेक जण निवडणुकीच्या निकालांवर तर्कवितर्क लावत असतात. यात उस्मानाबाद मतदारसंघातील घाटंग्री व वाघोली येथील दोन कार्यकर्त्यांत पैज लागली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडून कोण येणार? यावरुन ही पैज लागली आहे. एक म्हणतो, राणा दादा तर दुसरा म्हणतो ओमराजे. उस्मानाबाद मतदारसंघातील दोन पठ्ठ्यांनी निवडणूक निकालांवर पैज लावत चक्क स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेतलाय. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत यंदा शिवसेना-भाजपाकडून ओमराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून राणा रणजितसिंह पाटील निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे उस्मानाबाद निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.
राणा दादा की ओमराजे म्हणत चर्चांचे रुपांतर पैजेत होत असताना, आता पैज लावणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांची धडकी बसली आहे. निवडणुकांवरुन पैज लावणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता उस्मानाबाद येथेही असाच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी लावलेल्या पैजा रद्द होणार असेच दिसून येते. मात्र, कोण निवडणूक येणार याची उत्सुकता 23 मे पर्यंत कायम राहणार आहे.